जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
श्रीदेवींच्या मृत्यूची केस बंद; बोनी कपूरना क्लिन चीट
गेल्या तीन
दिवसापासून सुरु असलेली प्रतिक्षा आता संपण्याची चिन्हे दिसत आहेत. सुपरस्टार
श्रीदेवी यांचे पार्थिव भारतात आणण्यासाठी दुबई पोलिसांनी परवानगी दिली आहे. या
बाबतचे पत्र दुबईतील भारतीय उच्चायुक्तालयातील अधिकारी आणि कपूर कुटुंबीयांबा
देण्यात आले आहे. दुबई पोलिसांनी ही केस बंद केली आहे आणि बोनी कपूर यांना देखील
दुबई पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे श्रीदेवींच्या मृत्यूबाबत निर्माण
झालेली साशंकता संपुष्टात आली आहे. गेल्या तीन दिवसांपासून श्रीदेवी यांचे पार्थिव
भारतात कधी येणार या बाबत चर्चा सुरु होती. श्रीदेवींचे पार्थिव मंगळवारी
रात्रीपर्यंत मुंबईत आले. त्यांच्या वर आज विलेपार्ले येथे दुपारी अंत्यसंस्कार होतील
असा अंदाज आहे.
___________________________
‘जीएसटी’चा एकच दर लागू करणे अशक्य : जेटली
विद्यमान
परिस्थितीत ‘जीएसटी’चा एकच दर लागू करणे अशक्य असल्याचे प्रतिपादन
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मंगळवारी केले. भारत-कोरिया व्यापार परिषदेत
ते बोलत होते. अर्थव्यवस्थेच्या मजबुतीसाठी केंद्र सरकारने अनेक निर्णय घेतले आहेत,
याच्या परिणामी देशाचा जीडीपी दर 7 ते 8 टक्क्यांपेक्षाही जास्त जाऊ शकतो, असा विश्वास व्यक्त करून जेटली पुढे म्हणाले की, जगातील सर्वात वेगाने विकसित होत असलेला देश हा भारताचा
नावलौकिक येत्या 10 ते 20 वर्षांत तरी कायम राहील. करांचे सुसूत्रीकरण
करण्यात सरकारला यश आले आहे, असा दावा करून
जेटली पुढे म्हणाले की, काही क्षेत्रांना
जाणीवपूर्वक प्रोत्साहन दिले जात आहे. निर्मिती क्षेत्रात भारताला अजून बरेच काही
साध्य करायचे आहे. त्यामुळे देशांतर्गत निर्मिती वाढावी, यासाठी सरकार आगामी काळात विशेषत्वाने लक्ष देणार आहे,
असेही त्यांनी नमूद केले.
नीरव, चोक्सीचा आणखी १,३२२ कोटींचा घोटाळा
पंजाब नॅशनल
बँकेने नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांचा 1,322 कोटी रुपयांचा आणखी एक घोटाळा समोर आणला आहे. बँकेच्या
परदेशातील शाखेला मिळालेल्या नव्या लेटर ऑफ अंडरटेकिंगनंतर हा घोटाळा लक्षात आला
असून, पीएनबीने स्टॉक
एक्स्चेंजला त्याची माहिती दिली. यापूर्वी पीएनबीतील 11,400 कोटी रुपयांचा घोटाळा उघडकीस आला होता. नीरव मोदीच्या अवैध
व्यवहाराचा आकडा 12,700 कोटी
रुपयांपर्यंत पोहोचला असल्याचे पीएनबीने आपल्या फायलिंगमध्ये स्टॉक एक्स्चेंजला
कळवले आहे. नीरव मोदीच्या कंपन्यांनी आयात-निर्यातीशी संबंधित तब्बल 515 कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय व्यवहार दडवून
ठेवले.करचोरी करून करण्यात आलेले हे व्यवहार आता प्राप्तिकर विभागाकडून तपासले
जात आहेत.
________________________
हज यात्रेचा
विमान प्रवास स्वस्तात
केंद्र सरकारने
हज यात्रेकरूंना विमानाच्या तिकीट दरात सवलत देऊन दिलासा दिला आहे. गेल्या
महिन्यात केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हज यात्रेचे अनुदान
बंद केले होते. या पार्श्वभूमीवर हज यात्रेकरूंना विमानाच्या तिकीट दरात सवलत
देण्यात येणार आहे. एअर इंडिया, सौदी एअरलाईन्स,
फ्लायनास आदी विमान कंपन्यांचे तिकीट हज
यात्रेकरूंसाठी स्वस्त दरात उपलब्ध करून देण्याचा निर्णय अल्पसंख्याकमंत्री
मुख्तार अब्बास नकवी यांनी जाहीर केला. सौदी अरेबिया, जेदाह आणि मदिना येथील विमानतळांवर ही सुविधा मिळेल. तर
देशातील 21 विमानतळांवर हज
यात्रेकरूंना तिकीट दरात सवलत देण्यात येणार आहे. किमान 30 ते 40 हजारांदरम्यान
तिकीट दरात सवलत देण्यात येणार असल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

