जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात



शिवसेनेच्या माजी नगरसेवकाची निर्घृण हत्या



कांदिवली समतानगरचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री अज्ञात व्यक्तींनी चॉपरनं वार करुन निघृण हत्या केली. ठाकूर कॉम्प्लेक्समधील ऍव्हेन्यु हॉटेलमध्ये जेवून मोटारबाईकने घरी जात असताना मागून आलेल्या एका अनोळखी बाईक स्वाराने त्यांना हूल दिली. त्यामुळे सावंत आणि त्यांचा मोटारबाईक चालक रस्त्यावर कोसळले. सावंत यांच्यासोबत असलेला मोटारबाईक चालक हूल दिलेल्या मोटारबाईक स्वाराला पकडण्यासाठी त्याच्या मागे पळाला. तोपर्यंत मागून रिक्षातून आलेल्या हल्लेखोरांनी सावंत यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. ते त्यांच्या विभागात केबल व्यावसायिक होते. त्यांना खंडणीसाठी दोनवेळा धमकीचे फोन आले होते. दहशतवाद विरोधी पथकातील एसीपी सुभाष सावंत हे त्यांचे भाऊ आहे. मात्र कामावरुन काढून टाकल्याच्या रागातून सावंत यांची हत्या झाल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आलं आहे. एकजणला अटक करण्यात आली आहे. तर चौघाचां अद्याप शोध सुरु आहे.
_____________________


दलित समाजाच्या ऐक्यासाठी आठवले मंत्रीपद सोडणार



दलित समाज भीमा कोरेगावमध्ये घडलेल्या घटनेनंतर एक झाला असून, आपल्या समाजाकडून धडा घेत आता दलित नेत्यांनीही एकत्र आले पाहिजे, त्यासाठी जर माझे मंत्रीपद आड येत असेल तर तेही सोडण्याची आपली तयारी असल्याचे सांगत केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्याची तार पुन्हा एकदा छेडली आहे. त्याचबरोबर प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षाचे नेतृत्व करावे, अशी सादही त्यांनी यावेळी घातली. आठवले यांनी शनिवारी सकाळी पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन भीमा कोरेगाव प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय-सामाजिक परिस्थितीचा आढावा घेतला. चुकीच्या लोकांना बरोबर घेऊन प्रकाश आंबेडकर यांनीही एल्गार परिषद आयोजित करुन नये आणि त्यातून सामाजिक वातावरण बिघडवू नये, असा टोलाही त्यांनी लगावला.
_____________________



गांधीजींची हत्या नथुराम गोडसेनेच केलीः सर्वोच्च न्यायालय



गांधींजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करा अशी मागणी करणारी याचिका, सुप्रीम कोर्टात दाखल होती. त्याबाबत सुप्रीम कोर्टाने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अमरेंद्र शरण यांची एमिकस क्युरी म्हणून नियुक्ती केली होती. त्‍यानुसार या हत्‍येबाबत सर्व कागदपत्रे तपासून शरण यांनी उत्तर दाखल केले. गांधीजींच्या हत्येची पुन्हा चौकशी करण्याची गरज नसल्याचे शरण यांनी स्‍पष्‍ट केले आहे. शरण म्‍हणाले, ‘‘महात्मा गांधी यांच्या हत्येशी संबंधित सर्व कागदपत्रे तपासली आहेत. त्यांची हत्या नथुराम गोडसेनेच केली असून, त्यात दुसऱ्या कोणत्याही 'अज्ञात' व्यक्तीचा सहभाग नाही. त्‍यांच्या हत्येमध्ये  विदेशी हात असल्याचा आणि दोघांनी गोळीबार केल्याच्या दाव्यांमध्ये काहीही तथ्य नाही.
_____________________



समलैंगिक संबंधासंबंधी 'कलम ३७७ 'वर विचार करण्यास सर्वोच्च न्यायालय तयार


देशातील समलैंगिकतेच्या हक्कांसाठी लढणाऱ्या समाजसेवी संस्थांच्या लढ्याला यश मिळालंय. समलैंगिक संबंधांना फौजदारी गुन्हा ठरवणाऱ्या भारतीय दंड विधानातील कलम ३७७ बाबत सुप्रीम कोर्टाने पुनर्विचार करण्याचा निर्णय घेतला आहे. कोर्टाच्या घटना पीठाकडे हे प्रकरण वर्ग करण्यात आले आहे. सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांच्या अध्यक्षतेखालील तीन न्यायाधीशांच्या खंडपीठाने सोमवारी या याचिकांवर निकाल दिला. डिसेंबर २०१३ मधील निर्णयाबाबत पुनर्विचार करू, असं स्पष्ट करत खंडपीठाने हे प्रकरण घटना पीठाकडे वर्ग केलंय. समाजातील एक घटक किंवा व्यक्ती नेहमी भीतीच्या सावटाखाली वावरु शकत नाही, असंही कोर्टानं स्पष्ट केलंय. याबाबत सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारकडूनही उत्तर मागवले आहेत. ऑगस्ट २०१७ मध्ये दिलेल्या गोपनीयतेच्या अधिकाराचा दाखलाही सुप्रीम कोर्टाने निकाल देताना दिला आहे.
_____________________



राज्यात थंडीचा जोर आणखी वाढणार




राज्यात येत्या काही दिवसांत थंडी वाढणार असून, राज्यात मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि दक्षिण महाराष्ट्रातल्या काही भागांत पारा सरासरीपेक्षा खाली जाण्याची शक्यता आहे. काल रात्री नाशकात तापामान 8 अंशांवर उतरलं. तर मुंबईतल्या सांताक्रूझ वेधशाळेनं उपनगरातलं किमान तापमान साडे तेरा अंश नोंदवलं. उत्तर भारतातून थंड हवा महाराष्ट्राच्या दिशेनं येत आहे. त्यामुळे थंडी जास्त पडत असल्याचं कुलाबा वेधशाळेनं सांगितलं आहे. पुढील आठवड्यात महाराष्ट्रात इस्टर्न वारे परत वाहतील त्यामुळे थंडी कमी होईल. जानेवारीत बहुतेक वेळा तापमान कमी होते, असं कुलाबा वेधशाळा संचालिका शुभांगी भुत्ते यांनी सांगितलं.
_____________________

Popular posts from this blog

Top stories on October 2 in a capsule

Top stories on 8 January in a capsule

పాన్‌-ఆధార్‌ లింక్‌కు నెలాఖరే తుది గడువు