जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
अर्थसंकल्पातून करण्यात आला नवभारताच्या निर्मितीचा संकल्प : फडणवीस
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज सादर केलेला अर्थसंकल्प हा अभूतपूर्व आणि ऐतिहासिक असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची ‘सबका साथ-सबका विकास’ ही संकल्पना या अर्थसंकल्पामुळे आणखी विस्तारित झाली आहे. नवभारताच्या निर्मितीचा संकल्प सर्वसमावेशक असलेल्या या अर्थसंकल्पातून करण्यात आला असून त्यातून शेतकरी, गरीब, महिला,युवक, मागासवर्गीय आणि ज्येष्ठ नागरिक अशा विविध घटकांना न्याय देण्यात आला आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
________________________
निराशा करणारा अर्थसंकल्प : अशोक चव्हाण
केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांनी लोकसभेत सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे स्वप्नांची मालिका आणि घोषणांचा पाऊस आहे. अशी टीका काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी केली आहे. अर्थसंकल्पावर बोलताना अशोक चव्हाण यांनी या अर्थसंकल्पामध्ये अंमलबजावणीचा रोडमॅप दिसत नसल्याचे म्हंटले आहे. तसेच मोठमोठे आकडे सांगून प्रत्यक्षात लोकांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम सरकारने केल्याचे म्हंटले आहे. यावेळी हा अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांवर कराचा बोजा टाकणारा, महागाई वाढवणारा तसेच जनतेची निराशा करणारा असे त्यांनी ट्विट करून अर्थसंकल्पवर टीका केली.
_______________________
ना प्राप्तिकराचे दर बदलले, ना स्लॅब; मात्र वाढला इन्कम टॅक्स
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी मांडलेल्या यंदाच्या अर्थसंकल्पात इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये कुठलाही बदल होणार नसल्याचे जाहीर केले. मात्र करात 40 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनची घोषणा त्यांनी केली. मात्र 1 टक्का सेस वाढवल्यानं, तो 3 टक्क्यांवरून 4 टक्के करण्यात आल्यानं नोकरदारांना जास्त कर भरावा लागणार आहे. सध्याच्या करप्रणालीनुसार, अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर कोणत्याही प्रकारचा आयकर लागत नाही. अडीच ते पाच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर पाच टक्क्याच्या हिशोबाने कर लागतो. पाच लाखांपासून ते 10 लाखांपर्यंतच्या वार्षिक उत्पन्नावर 20 टक्के, तर 10 लाखांहून जास्त उत्पन्नावर 30 टक्के कर लागतो.
____________________________
अर्थसंकल्प २०१८ मध्ये महाराष्ट्राला काय काय मिळाले?
गुरुवारी अर्थमंत्र्यांनी मांडलेल्या २०१८च्या अर्थसंकल्पात महाराष्ट्र राज्य साठी या प्रमाणे तरतूद करण्यात आल्या आहेत;
- कृषि उत्पन्न बाजार समित्यांच्या पुढे जाऊन शेतमालासाठी बाजारपेठ उपलब्ध करण्यासाठी 2 हजार कोटींची तरतूद झाली आहे
- 2022 पर्यंत सर्वांना घरं देण्याची घोषणा केंद्र सरकारने केली आहे. खाजगी-सार्वजनिक भागिदारीतून हे साध्य करण्यात येणार आहे
- सिंचन प्रकल्पाच्या पूर्ततेसाठी राज्य सरकारची 3500 कोटींची मागणी. त्यावर विचार सुरू
- मुंबईतल्या उपनगरी रेल्वे : 90 किमी मार्गाच्या दुहेरीकरणासाठी 11 हजार कोटींची तरतूद
- मुंबई रेल्वे आणि उपनगरी सेवेसाठी 50 हजार कोटींची तरतूद
- मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन चालवण्यासाठी विशेष कौशल्य असलेले कर्मचारी लागणार आहेत. त्यांच्या प्रशिक्षणासाठी बडोद्यात प्रशिक्षण केंद्र
- सर्व रेल्वे स्थानकांवर वाय-फायची सोय
- विमानतळं नवीन शहरांना जोडणार. राज्यात तीन विमानतळांच्या उभारणीचं काम सुरू
राजस्थान पोटनिवडणुकीत भाजपला काँग्रेसचा ‘दे धक्का’
काँग्रेसने भाजपला राजस्थानमधील अलवर, अजमेर लोकसभा आणि मांडलगढ विधानसभेच्या पोट निवडणुकीत जोरदार धक्का दिला आहे. काँग्रेसने येथे लोकसभेच्या दोन आणि विधान सभेची एक जागा जिंकली आहे. या तीन ठिकाणी भाजप खासदार प्रा. सांवर लाल जाट (अजमेर), खासदार चांद नाथ योगी (अलवर) आणि आमदार कीर्ति कुमारी (मांडलगढ) यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक झाली. त्याची गुरुवारी मतमोजणी सुरु झाली. राजस्थानमधील लोकसभेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसने आघाडी घेतली होती. त्यामुळे भाजपच्या गोटात चिंता होती. तर दुसरीकडे काँग्रेसने आधीच विजयाचा दावा केला होता आणि तो दावा त्यांनी निवडणूक जिंकून खरा केला आहे.
_____________________________


