जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात




चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सक्‍ती नाही : सर्वोच्च न्यायालय


गत काही काळापासून चित्रपटगृहांतील राष्‍ट्रगीत सक्‍तीवरून सुरू असणारे द्वंद्व आता थांबणार आहे. सर्वोच्‍च न्यायालयाने केंद्र सरकाच्या विनंतीनुसार आपला राष्‍ट्रगीत सक्‍तीचा निर्णय मागे घेतला आहे. याबाबत झालेल्या आजच्या सुनावणीत सर्वोच्‍च न्यायालयाने हा निकाल दिला. दरम्यान, तत्कालीन सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी नोव्हेंबर २०१६ रोजी चित्रपटगृहांत चित्रपट सुरू होण्याआधी राष्ट्रगीत गायनाची सक्ती केली होती. तर ऑक्टोबर २०१७ रोजी तत्कालीन न्या. डी. वाय. चंद्रचूड यांनी राष्ट्रगीत गायनावेळी उभे राहण्याची प्रेक्षकांवर सक्ती करता येणार नसल्याचे मत नोंदविले होते. लोकांवर नैतिक धोरणांची सक्ती करणे उचित नाही. उभे राहिल्याने राष्ट्रभक्ती सिद्ध झाली, असे म्हणणे तर्कसंगत नसल्याचेही चंद्रचूड यांनी केंद्र सरकारला नव्याने परिपत्रक जारी करण्याचे आदेश दिले होते. या पार्श्‍वभूमीवर केंद्र सरकारने हा आदेश मागे घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने हा निकाल दिला आहे.
_____________________________



महाराष्ट्रातील ९२ टक्के नागरिकांकडे आधारकार्ड




डिसेंबर 2017 अखेरपर्यंत देशात 88.5 टक्के नागरिकांना आधारकार्डचे वितरण झाले असून, महाराष्ट्रात 92.6 टक्के नागरिकांना आधारकार्डचे वितरण झाले असल्याची माहिती राज्य सरकारकडून देण्यात आली आहे. देशातील 116 कोटी 54 लाख 28 हजार 377 नागरिकांना 31 डिसेंबर 2017 अखेर आधारकार्ड देण्यात आली आहेत. राज्यातील पाच वर्षांखालील 99 लाख 62 हजार 603 बालकांपैकी डिसेंबर 2017 अखेर 40 लाख 90 हजार 152 बालकांची आधार नोंदणी झाली आहे. हे प्रमाण 41.1 टक्के इतके आहे. महाराष्ट्रातील पाच ते अठरा वयोगटातील 2 कोटी 95 लाख 9 हजार 486 किशोरवयीन युवकांपैकी 2 कोटी 39 लाख 6 हजार 897 युवकांना आधारकार्ड देण्यात आली आहेत. राज्यातील आधार नोंदणीचे हे प्रमाण 82.6 टक्के इतके आहे.
_____________________________



भारतात रोज २४४ कोटींच्या अन्नधान्याची नासाडी




भारताने जरी मंगळावर जाण्याच्या कितीही गप्पा मारल्या तरी आजही देशातील कोट्यवधी जनतेला उपाशीपोटी झोपावे लागते, हे एक वास्तव सत्य आहे.  याचा अर्थ देशात अन्नधान्याचे उत्पादन कमी होते असा नाही तर ते गरजूंपर्यंत वेळेत पोहोचत नाही. भारतात रोज 19 कोटी लोक उपाशीपोटी रहात असताना या देशात रोज 244 कोटींच्या अन्नाची नासाडी होते. याअनुषंगाने वर्षाचे गणित मांडले तर अन्नाच्या नासाडीचा आकडा 88,800 कोटी रुपयांवर जातो, असे संयुक्त राष्ट्रांच्या अन्न आणि कृषि संघटनेच्या (एफएओ) अलिकडेच प्रसिध्द झालेल्या अहवालात म्हटले आहे. वाया जाणार्‍या अन्नामध्ये 21 दशलक्ष टन गव्हाच्या उत्पादनांचा समावेश आहे. याशिवाय पीक काढणीनंतर होणार्‍या नुकसानीचा आकडा एक लाख कोटी रुपयांवर जातो.
_____________________________


यंदाचे अर्थसंकल्प मध्यमवर्गीयांसाठी चांगले असण्याची शक्यता




पुढील वर्षी होणार्‍या सार्वत्रिक निवडणुकांवर डोळा ठेवून केंद्र सरकारने अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना दिलासा देण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. करसवलत मर्यादेत वाढ, प्रमाणित वजावट सुरू करणे, मुदत ठेवीसह गुंतवणुकीवर अधिक परतावा, आरोग्य विमा आदी योजनांच्या माध्यमातून भाजपची मतपेढी समजल्या जाणार्‍या मध्यमवर्गीयांना खूश करण्याचा केंद्र सरकारचा इरादा आहे. एक फेब्रुवारी रोजी अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. 29 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनास प्रारंभ होणार आहे. 2019 साली लोकसभेच्या निवडणुका होणार आहेत. मध्यमवर्गीय हा भाजपचा मतदार मानला जातो. या घटकास खूश करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्यात चर्चा झाल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली. सध्या अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न करमुक्त आहे.या मर्यादेत वाढ करण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे.
_____________________________ 

जगभरात यंदा झोंबणारी थंडी

  


केवळ भारतच नाही, तर जगात सर्वत्र थंडीची महालाट आली असून अमेरिकेतील अनेक शहरांचे तापमान उणे 35 पर्यंत खाली गेले आहे. इंग्लंड, जर्मनीसह अखंड युरोपलाही कडाक्याच्या थंडीने गोठवून टाकले आहे. अमेरिकेचा पूर्व किनारा आणि मध्य भागात परिस्थिती सर्वात वाईट आहे. धु्रवीय आर्क्टिक प्रदेशातून येणार्‍या थंड हवेमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या थंडीचे वर्णन बॉम्ब सायक्लोनअसे केले जात आहे. जगप्रसिद्ध नायगारा धबधबाही गोठून गेला आहे. या लाटेने आतापर्यंत 30 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. नेपाळमध्ये कडाक्याच्या थंडीने आतापर्यंत सात बळी घेतले आहेत.
________________________


ब्रुसेलोसिसआजाराने नागपुरातील १० टक्के पशुचिकित्सक बाधित



ब्रुसेलोसिसएक घातक आजार असून गाई व म्हशींमध्ये हा व्हायरस आढळून येतो. बाधित जनावराचे कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा त्याचे चामडे काढताना हाताला असलेल्या जखमेचा थेट संबंध येतो. त्यामुळे तो व्हायरस मनुष्याच्या शरीरात पसरतो. या आजारामुळे पशुसंवर्धन विभागालाच धोका निर्माण झाला आहे. १० टक्के पशुचिकित्सक या आजाराने बाधित झाल्याची माहिती पुढे आली आहे. ब्रुसेलोसिस गाईंमध्ये आढळणारा आजार असून कच्चे दूध प्राशन केल्याने किंवा थेट संपर्कात आल्याने मनुष्यालाही त्या आजाराची लागण होते. ब्रुसोलोसिस व्हायरस शरीरात पसरल्यानंतर अंगदुखी, गुडघेदुखी, वंध्यत्व येण्याचा धोका असतो. जसजसा व्हायरस वाढतो, त्याच प्रमाणात शारीरिक त्रास वाढतो. एकदा आजाराची लागण झाल्यानंतर त्यावर उपचारही नसल्याचे त्यांनी सांगितले. नियमित उपचाराने त्यावर नियंत्रण प्राप्त करता येते.
________________________

Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule