जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात




कोरेगाव भीमा प्रकरणी मला टार्गेट केलं जातंय- जिग्नेश मेवाणी



मी ३१ डिसेंबरला पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत कोणत्याही प्रकारचे भडकाऊ भाषण केलेले नाही. भीमा-कोरेगाव घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी काहीच का बोलत नाहीत, असा सवाल वडगामचे नवनिर्वाचित आमदार आणि दलित नेते जिग्नेश मेवाणी यांनी केला आहे. प्रक्षोभक भाषण केल्याप्रकरणी पुण्यात मेवाणी आणि विद्यार्थी नेता उमर खालिद यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भीमा-कोरेगाव लढ्याला २०० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ३१ डिसेंबरला शनिवारवाड्यावर एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. आमदार जिग्नेश मेवाणी, जेएनयू नेता उमर खालिद या परिषदेत सहभागी झाले होते. आपण पंतप्रधानांना संविधान आणि मनुस्मृती घेऊन भेटणार असल्याचेही मेवाणी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधानांसमोर या दोन्ही गोष्टी ठेवल्यानंतर ते मनुस्मृती आणि संविधान यापैकी काय निवडतात, हे मला पाहायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
________________________


कोणत्याही समितीच्या चौकशीला तयार- संभाजी भिडे



माझे नाव भीमा कोरेगाव हिंसाचार प्रकरणात नाहक गोवण्यात आले असून माझा या सगळ्या प्रकरणाशी काहीही संबंध नसून कोणत्याही चौकशीला सामोरे जायला तयार आहे असल्याची प्रतिक्रिया संभाजी भिडे गुरुजींनी पत्रकारांना दिली. माझ्यावर आरोप हे हातातून सत्ता गेलेल्यांच्या मनातील कौरवनीतीतून करण्यात आले आहेत. पिंपरी आणि औरंगाबाद या ठिकाणी भिडे गुरुजींच्या विरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचमुळे भिडे गुरुजींच्या या रविवारी होणा-या व्याख्यानाला परवानगीही नाकारण्यात आली आहे. भिडे गुरुजींनी याच सगळ्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी प्रसारमाध्यमांसमोर येत आपली भूमिका मांडली. सांगली येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
________________________


सत्तर वर्षांत पहिल्यांदाच बदलणार एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश



महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळासाठी २०१८हे वर्ष परिवर्तनाचे वर्ष ठरणार असून एसटी कर्मचाऱ्यांचा गणवेश सत्तर वर्षांत पहिल्यांदाच बदलणार आहे. याबाबतची घोषणा परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी केली. मुंबई सेंट्रलमधील मुख्यालयाबरोबरच महाराष्ट्रातील एसटीच्या १३ विभागीय कार्यालयात कर्मचाऱ्यांना ६ जानेवारी २०१८ रोजी नवीन गणवेश वितरण सोहळा होणार आहे. दरवर्षी त्यांना एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना गणवेशासाठी कापड दिले जायचे. पहिल्यांदाच एसटीतील सर्व कर्मचाऱ्यांना तयार गणवेश देण्याची संकल्पना रावते यांनी मांडली तर केंद्र शासनाच्या वस्त्रोद्योग खात्याच्या अखत्यारीत येणाऱ्या राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थान’ (NIFT) या संस्थेला एसटी कर्मचाऱ्यांचे नवीन गणवेश डिझाईनतयार करण्यासाठी पाचारण करण्यात आले आहे.
 ________________________


आमची सुरक्षा करण्‍यात सरकार कमी पडले : भीमा कोरेगाव ग्रामस्‍थ


कोरेगाव भीमाच्या घटनेनंतर राज्यभरात तीव्र हिंसक पडसाद उमटले होते. त्यानंतर कोरेगाव भीमामध्ये सर्व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी सर्वजण गुण्यागोविंदाने एकत्र रहात आहोत आणि यापुढेही राहणार आहोत, अशी भावना व्यक्त केली. दंगल गावाबाहेरील कार्यकर्त्यांनी व संघटनांनी गावात केल्याचा आरोपही यावेळी ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला. कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये गावातील महिला व मुलींना मारहाण झालेल्यांवर कारवाई करावी, दंगलीतील मृत कुटुंबीयांच्या नातेवाईकाला १ कोटींची नुकसान भरपाई करावी, अशी मागणी केली. हा हिंसाचार पोलिसांनी व्यवस्थित बंदोबस्त ठेवला नसल्यामुळे झाल्याचा गंभीर आरोप कोरेगाव भीमा ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. सरकारने येथील कार्यक्रमाची कल्पना असूनही हलगर्जीपणा दाखविल्याची टीकाही त्यांनी केली.
________________________


गोव्यात आता सार्वजनिक ठिकाणी मद्यपान दंडनीय अपराध




पुढील महिन्यापासून गोव्यात सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणे दंडनीय अपराध ठरणार असल्यामुळे समुद्रकिनारी बसून निवांत दारु पिण्यासाठी गोव्याचा मार्ग धरणाऱ्या पर्यटकांचा हिरमोड होणार आहे. या नव्या नियमाची घोषणा गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केली असून हा नियम दारुच्या सेवनामुळे नाही, तर दारुच्या रिकाम्या बाटल्यांमुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी करण्यात आला आहे. दारुच्या रिकाम्या बाटल्यांचा खच गोव्यात सार्वजनिक ठिकाणी पडल्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाची गोवा सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी येत्या १५ दिवसात कायद्यात तरतूद करुन त्याची फेब्रुवारी महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे स्पष्ट केले.
________________________


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule