जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
हेलिकॉप्टर अपघातातून चौथ्यांदा बचावले फडणवीस
गुरुवारी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हेलिकॉप्टर अपघात टळला. मुख्यमंत्र्यांचे
हेलिकॉप्टर मुंबईजवळील भाईंदरमध्ये लँडिंग करत असताना हा प्रकार घडला. या
हेलिकॉप्टरच्या मार्गात केबल आल्याने ते पुन्हा वर घेण्यात आले. सतर्कतेमुळे हा
अपघात सुदैवाने टळला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध कामांच्या भूमिपूजनासाठी
मीरा भाईंदर येथे आले होते. पण त्यावेळी त्यांचे हेलिकॉप्टर केबलमुळे इतरत्र
भरकटले आणि इमर्जन्सी लँडिंग करावे लागले असल्याचे सांगितले जात आहे.
हेलिकॉप्टरमध्ये त्यांच्या बरोबर नितीन गडकरी देखील होते. देवेंद्र फडणवीस हे
चौथ्यांदा अशा प्रकारच्या अपघातातून वाचले आहेत. या पूर्वी 25 मे 2017 रोजी लातूरहून मुंबईकडे येण्यासाठी टेक ऑफ घेतल्यानंकतर
काही क्षणातच कोसळलं होतं. 7 जुलै 2017
रोजी अलिबाग येथे हेलिकॉप्टर लँडिंग मार्कच्या
पुढे सरकल्यानं मागील पाते मुख्यमंत्र्यांचा डोक्याला लागण्याचा धोका उद्भवला
होता. तर 9 डिसेंबर 2017 रोजी नाशीक येथे हेलिकॉप्टरने उड्डाण
केल्यानंतर क्षमतेपेक्षा अधिक वजन झाल्याने इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले होते.
______________________
राहुल गांधींच्या उपस्थितीत नाना पटोलेंची ‘घरवापसी’
गुरुवारी
काँग्रेसमध्ये नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या कार्यपद्धतीवर बोचरी टीका करत
भाजपला रामराम करणारे नाना पटोले यांनी प्रवेश केला. नाना पटोले यांनी काँग्रेस
अध्यक्ष राहुल गांधी यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला असून पुन्हा राज्याच्या
राजकारणात ते सक्रीय होतील, अशी चर्चा आहे. डिसेंबरमध्ये
खासदारकीचा राजीनामा देत नाना पटोले यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली होती. विदर्भात
भाजपला भंडारा- गोंदियाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पटोले यांच्या राजीनाम्यामुळे
हादरा बसला होता. काँग्रेसमध्ये पटोले हे प्रवेश करणार, अशी चर्चा आधीपासूनच होती. पटोले यांनी गुरुवारी दुपारी
दिल्लीत राहुल गांधी यांची भेट घेतली. या प्रसंगी अशोक चव्हाण, संजय निरुपम आदी नेते उपस्थित होते.
______________________
स्पर्धा परीक्षांमध्ये अनाथ विद्यार्थ्यांसाठी वेगळा प्रवर्ग ठेवणार : मुख्यमंत्री
राज्य शासनाच्या
स्पर्धा परीक्षा देणाऱ्या अनाथ विद्यार्थ्यांना जाती- जमातींसाठी राखीव असलेल्या
प्रवर्गासाठीच्या आरक्षणाचा लाभ होत नाही. ही बाब लक्षात घेता अनाथ
विद्यार्थ्यांसाठी परीक्षांमध्ये राखीव जागांचा वेगळा प्रवर्ग ठेवण्याबाबत निर्णय
घेण्यात येईल, अशी माहिती
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या कार्यक्रमात दिली. महाराष्ट्र लोकसेवा
आयोगाची स्पर्धा परीक्षा देणाऱ्या एक विद्यार्थिनीने नुकतीच भेट घेऊन याबाबतची
आपली समस्या मांडली होती. तिला चांगले गुण असले तरी खुल्या गटातून निवडीसाठी पात्र
होण्याइतके गुण नव्हते. त्यामुळे ही समस्या लक्षात आली असून या माध्यमातून पुरोगामी
महाराष्ट्रासाठी महत्त्वपूर्ण ठरु शकेल असा निर्णय घेण्यात येणार आहे. मंत्रालय व
विधीमंडळ वार्ताहर संघाच्या वार्षिक पुरस्कारांचे वितरण राज्यपाल राव यांच्या
हस्ते आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत (काल दि.10) मुंबईत पार पडले.
______________________
मुंबईत मेट्रो खोदकामा दरम्यान सापडले दोन क्रूड बॉम्ब
बुधवारी सायंकाळी
चारच्या सुमारास बॉम्बे सेंट्रल येथील मराठा मंदिर परिसरा लगतच्या खोदकामादरम्यान
जमिनीच्या दोन मीटर अंतरावर बॉम्बसदृष्य वस्तू आढळल्याने खळबळ उडाली. पोलीस तेथे
दाखल झाले. बॉम्ब शोधक पथकाने तपासणीस सुरुवात केली. तेव्हा त्यात दोन गावठी बॉम्ब
असल्याची माहिती समोर आली. एक बॉम्ब निकामी करण्यात आला. यामध्ये फटाक्यांची पावडर,
खिळे आणि विशिष्ट स्वरुपाच्या दगडी आढळून
आल्या. याचे नमुने बॅलेस्टिक एक्स्पर्टकडे पाठविण्यात आले. १५ ते २० वर्षांपूर्वी
ते या ठिकाणी कोणीतरी दडवून ठेवल्याचा संशय वर्तविण्यात येत आहे.
______________________
घरांच्या किंमतीत मोठी घसरण
नोटाबंदी, रिअल इस्टेट रेग्युलेशन अॅक्ट (रेरा) आणि वस्तू आणि सेवा
कराचा (जीएसटी) फटका बसल्याने रहिवासी घरांच्या किंमतीत घसरण झाल्याचं पहायला मिळत
आहे. नाइट फ्रँकने दिलेल्या अहवालानुसार, शहरांमध्ये जवळपास 3 टक्क्यांनी
घरांच्या किंमती घसरल्या आहेत. सर्वात जास्त घसरण पुण्यात झाली असून इथे 7 टक्क्यांनी घरांच्या किंमती घसरल्या आहेत.
यानंतर मुंबईचा क्रमांक असून 5 टक्क्यांची घसरण
झाली आहे. एनसीआरमध्ये जिथे आधीच गेल्या सहा वर्षांपासून किंमती खालावत आहेत तिथे 2
टक्क्यांची घसरण झाली आहे. घरांच्या विक्रीत
खूप मोठी घट झाली असल्या कारणाने यावर्षी नवीन प्रोजक्ट्सही लाँच करण्यात आलेले
नाहीत. गतवर्षी नवे प्रोजेक्ट्स लाँच करण्याच्या बाबतीत एनसीआर दिल्लीत 56 टक्के तर बंगळुरुत 41 टक्क्यांनी घट झालेली पहायला मिळाली. रिअल इस्टेट क्षेत्राला
यामुळे मोठा फटका बसला आहे.
______________________


