जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या वाचा ५ मिनटात
अकोल्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय
शेतक-यांच्या
विविध मागण्यांसाठी शेतकरी जागर मंचाद्वारे येथील पोलीस मुख्यालयात माजी केंद्रीय
अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या आंदोलनाचा अखेर बुधवारी
विजय झाला. मुख्यमंत्र्यांसोबत फोनवरून झालेल्या चर्चेदरम्यान त्यांनी आमच्या सर्व
मागण्या मान्य केल्या. त्यामुळे आम्ही हे आंदोलन आता मागे घेत असल्याचे यशवंत
सिन्हा यांनी सायंकाळी बातमीदारांशी बोलताना जाहीर केले. येथील पोलीस मुख्यालयात
गत तीन दिवसांपासून शेतकरी यशवंत सिन्हा यांच्या नेतृत्वात आंदोलन करीत आहेत. या
तीन दिवसांदरम्यान विविध पक्षांचा आंदोलनास पाठिंबा मिळाला. या दबावापुढे झुकत
सरकारने शेतक-यांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. मागण्या मान्य केल्या असल्या,
तरी सरकारने अंमलबजावणीत कसूर केली तर पुन्हा
आंदोलन करू, असा इशाराही
सिन्हा यांनी दिला.
'ओखी' चक्रीवादळाने दिल्लीकरांना दिलासा तर मुंबईकरांवर आजारपणाचे सावट
गुजरात आणि
महाराष्ट्रमध्ये ओखीचा प्रभाव कमी होईल, तसेच नवी दिल्ली आणि उत्तर भारतात जे धुक्याचे जाळे पसरले आहे, तेदेखील कमी होईल, असे नासाने म्हटले आहे. यामुळे आता मळमळ, डोळ्यांची जळजळ आणि श्वसनाच्या विकारांपासून
दिल्लीकरांची सुटका होईल. ‘ओखी’ चक्रीवादळाने आतापर्यंत ३९ बळी घेतले असून १६७
मासेमार बेपत्ता आहेत, अशी माहिती
केंद्रीय गृह मंत्रालयाने दिली आहे. केरळमध्ये २९ तर तामिळनाडूमध्ये १० जणांचा बळी
गेला आहे. तसेच ओखीमुळे झालेल्या अवकाळी पावसाचे
नागरिकांच्या आरोग्यावर पडसाद उमटणार असून आजारपणाचे सावंत बाधीत
क्षेत्रांवर होणार आहे. महाराष्ट्र राज्यातील रत्नागिरी किनारपट्टीवर या वादळाचा
सर्वात जास्त प्रभाव पडला आहे. दापोलितल्या हर्णै, पाजपंढरी, मुरुड करजगाव
तामसतीर्थ आणि लाडघर किनारपट्टीला याचा सर्वाधिक फटका बसला आहे.
_______________________________
प्रवाशांना भीम अॅप वापरून तिकीट काढता येणार
रेल्वे
प्रवाशांना भीम अॅपचा (भारत इंटरफेस फॉर मनी) वापर करून तिकीट काढता येणार आहे. १
डिसेंबर पासून अंमलबजावणी करण्यास सुरूवात झाली आहे. भीम अॅपद्वारे पैसे भरून तिकीट
आरक्षित करता येणार आहे. कॅशलेसला प्रोत्साहन देण्यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात
आल्याची माहिती देण्यात आली. सहा महिन्यांच्या प्रायोगिक तत्त्वावर हा उपक्रम सुरू
करण्यात आला असून, प्रवाशांच्या
पसंतीस हे अॅप उतरल्याचे दिसून येत आहे. नोव्हेंबर २०१६ पूर्वी कॅशलेसद्वारे
देशभरात आरक्षित रेल्वे तिकीट काढणार्यांची संख्या ५८ टक्के एवढी होती. नोव्हेंबर
२०१६ नंतर हेच प्रमाण ७० टक्के एवढे झाले. आता भीम अॅपमुळे प्रवाशांना अधिक
सोयीचे होणार असून, चुटकीसरशी पैसे
ट्रान्स्फर करून तिकीट काढता येणे सहज शक्य होणार आहे.
_______________________________
बिटकॉइनपासून दूर राहा : आरबीआय
बिटकॉईनबाबत
सध्या देशातील गुंतवणूकदारांमध्ये आकर्षण वाढले असून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्याच
पार्श्वभूमीवर गुंतवणूकदारांना बिटकॉइनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे.
यापूर्वीही आरबीआयने बिटकॉइनच्या प्रलोभनाला बळी पडू नये, असे सांगितले होते. बँकेने त्यावरुनच पुन्हा गुंतवणुकदरांना
बिटकाईनपासून दूर राहण्याचा सल्ला दिला आहे . बिटकॉइनच्या मूल्यामध्ये वाढ आणि
इनिशियल कॉईनच्या ऑफर्स (ICO)मधील अधिक वाढ
झाल्याने, त्यावर बँकेने यावेळी
चिंता व्यक्त केली होती. दरम्यान, एका बिटकॉईनचे
मूल्य गेल्या आठवड्यात तब्बल ११ हजार डॉलर्सवर पोहोचल्यामुळे सर्वांनाच धक्का दिला
होता. कोणत्याही मौद्रिक प्राधिकरणाच्या माध्यमातून बिटकॉईनचे नियंत्रण होत नाही.
_______________________________
_______________________________
तिसरा कसोटी सामना अनिर्णित
फिरोजशहा कोटला
मैदानावर रंगलेला तिसरा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात श्रीलंकेला यश आले. पण तीन
सामन्यांची कसोटी मालिका भारतीय संघाने १-० अशी जिंकली आहे. श्रीलंकेची चौथ्या
दिवशी ३ बाद ३१ अशी बिकट अवस्था केल्यानंतर भारतीय संघ आज विजयाच्या इराद्याने
मैदानात उतरला. पण श्रीलंकेने सामना धनंजया सिल्व्हाच्या नाबाद ११९ धावा आणि रोशन
सिल्व्हाच्या अर्धशतकाच्या जोरावर अनिर्णित राखण्यात यश मिळवले. भारताने नागपूर
कसोटीत मिळवलेल्या विजयाच्या जोरावर मालिका १-० अशी खिशात घातली. श्रीलंकन खेळाडू
दिल्लीच्या मैदानात दुसऱ्या दिवशी तोंडाला मास्क बांधून मैदानात उतरल्यामुळे
चांगलीच चर्चा रंगली होती.
_______________________________
_______________________________




