जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात
गुजरातमध्ये सहाव्यांदा भाजपाची सत्ता
गुजरातचा गड सलग
सहाव्यांदाच राखतांना भाजपची चांगलीच दमछाक झाल्याचे दिसून आले. 182 जागांच्या विधानसभेत भाजपने 99 जागा जिंकून स्पष्ट बहुमत मिळवले. 2012 च्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा भाजपला 16
जागांचा फटका बसला आहे. राहुल गांधी यांच्या
नेतृत्वाखाली काँग्रेसला सत्तांतर करण्यात अपयश आले असले तरी 2012 च्या तुलनेत प्रभावी कामगिरी करतांना 80
जागा खिशात घातल्या. 2012 च्या तुलनेत काँग्रेसला जवळपास 20 जागा जास्त मिळाल्या आहेत. भाजपच्या पारड्यात 49.1
टक्के मते पडली असून 2012 साली ही टक्केवारी 48 होती. 2012 साली 39 टक्के मते मिळालेल्या काँग्रेसला यंदा 41.4
टक्के मते मिळाली असून हे देखील राहुल
गांधीच्या बदललेल्या प्रतिमेचे प्रतिक मानले जात आहे. भाजपचे शहरांतील मतदारांनी
तारले तर ग्रामीण गुजरातने काँग्रेसला हात दिल्याचे चित्र आहे.
_____________________
हिमाचलमध्ये काँग्रेसवर मात करत भाजपची सत्ता
हिमाचल प्रदेश
मध्ये ९ नोव्हेंबर रोजी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सोमवारी सकाळी ८ वाजता पासून
करण्यात आली. ६८ जागांच्या विधानसभेत ४४ जागा जिंकून भाजपाने बहुमताने सत्ता बसवली
आहे. आधी सत्तेवर असलेल्या काँग्रेसला या निवडणुकीत फक्त २१ जागा जिंकता आल्या.
भाजपाला बहुमत मिळाले असले तरी त्यांचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार प्रेम कुमार
धुमल सुजनपूर मतदार संघातून पराभूत झाले. सर्वांचे लक्ष गुजरात कडे असले तरी हिमाचलप्रदेश
मध्येही निवडणूकीत विकास आणि भ्रष्टाचार हा मुद्दा प्रचारात होता. सत्तेत असलेल्या
काँग्रेसचे मुख्यमंत्री विरभद्रसिंग यांच्यावर बरेच भ्रष्टाचाराचे आरोप झाले.
याचसाठी त्यांची चौकशी सुरु आहे. याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसल्याचे दिसत
आहे.
_____________________
गुजरातचा निकाल भाजपसाठी 'हायसं' वाटणारा पण काँग्रेससाठी निराश करणारा नाही
गुजरातमध्ये भाजप
99 जागांसह सलग पाचव्यांदा
सत्तेत आलं असलं तरी भाजपला जागांची शंभरी पार करता आलेली नाही, याउलट राहुल गांधींच्या नेतृत्वात काँग्रेसने
मोदी - शहांचं होम ग्राऊंड असलेल्या गुजरातमध्ये पहिल्यांदाच 77 जागा जिंकत प्रथमच जोरदार टक्कर दिलीय. भारतीय
ट्रायबल पार्टीला 02 तर शरद
पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 01 जागा मिळालीय. तीन जागांवर अपक्ष निवडून आलेत. त्यापैकी युवा दलित नेते
जिग्नेश मेवाणी हे अगदी घर असलेल्या वडगाम
गावातून भाजपावर मात करीत अपक्ष म्हणून निवडून आले त्यांच्या या विजयाने नरेंद्र
मोदींची मात्र चांगलीच गोची झाली आहे. तसेच गुजरातच्या निवडणुकीत भाजपला 49.01
टक्के मतं मिळालीत. तर काँग्रेसला 41.40
टक्के मतं मिळालीत. गुजरातच्या निवडणुकीत 'नोटा'ला तब्बल 1.8% टक्के म्हणजेच 5
लाख 51हजार 615 मतं मिळालीत.
याचाही राजकीय पक्षांनी गांभिर्याने विचार करण्याची गरज आहे.
_____________________
छगन भुजबळांच्या जामिनाला कोर्टाचा नकार
राष्ट्रवादी
काँग्रेसचे नेते आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी तुरूंगात असलेले छगन भुजबळ यांचा
जामिनाचा अर्ज सोमवारी पीएमएलए कोर्टाने नाकारला. आता भुजबळ पीएमएनएल कोर्टाच्या
निर्णयाविरुद्ध हायकोर्टाचा दरवाजा ठोठावणार आहेत. सुप्रीम कोर्टाने पीएमएलए
अधिनियमातील अनुच्छेद ४५ रद्द केल्यानंतर आपल्याला जामीन मिळेल असे भुजबळ यांना
वाटत होते. मात्र छगन भुजबळ यांनी जामिनासाठी केलेला अर्ज घटनाबाह्य असल्याचे
म्हणत अंमलबजावणी संचालनालयातर्फे एच. एच. वेनेगावकर यांनी या जामीन अर्जाला
कडाडून विरोध केला होता. काही दिवसांपूर्वी सुप्रीम कोर्टाने पीएमएलए अधिनियमातील
अनुच्छेद ४५ रद्द केले होते. या कलमांतर्गत अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना
जामीन अर्जासाठी पुन्हा कोर्टात जाता येईल असे सुप्रीम कोर्टाने त्यावेळी म्हटले
होते.
_____________________
सुशील कुमार पाठोपाठ साक्षी मलिकने पटकावलं 'सुवर्ण पदक'
दक्षिण
आफ्रिकेच्या जोहानिसबर्ग खेळण्यात आलेल्या कॉमनवेल्थ कुस्ती चॅम्पिअनशिपमध्ये
भारताचा विजय झाला आहे. यामध्ये रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावलेल्या साक्षी
मलिकने सुवर्ण पदक जिंकून देशाचं नाव अभिमानाने उंचावलं आहे. साक्षीने
न्यूझीलँडच्या तायला तुअहिने फोर्डला महिलांच्या फ्रीस्टाइल प्रतियोगिताच्या ६२
किलो वजनाच्या वर्गात मजल मारली आहे. साक्षीने १३ - २ अशी चांगली टक्कर दिली.
कॉमनवेल्थ रेसलिंग चॅम्पियनशीपमध्ये 74 वजनी फ्री स्टाईल गटात सुशील कुमारने
सुवर्णपदक कमावले आहे. ८-० अशी दमदार कामगिरी करत सुशीलने हे सुवर्णपदक कमावले
आहे. सुशील कुमार या भारतीय कुस्तीपटूची 'कम्पेटेटीव्ह रेसलिंग'मध्ये पुनरागमन
झालं आहे. सुशीलचे हे पुनरागमन 'गोल्डन' कमाई ठरली आहे.
_____________________




