२० नोव्हेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
गुजरात निवडणुकीत काँग्रेसची गोची
येत्या महिन्यात
गुजरात होणाऱ्या निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने पहिली यादी जाहीर केली. हार्दिक
पटेल यांच्या पाटीदार अनामत आंदोलन समिती (पास) आणि काँग्रेस पक्षांमध्ये झालेल्या
युतीच्या करारानुसार काँग्रेसने हार्दिक पटेल यांच्या पासच्या २० उमेदवारांना संधी
देणार असल्याचा निर्णय झाला होता. मात्र ७७ जागेंसाठी जाहीर झालेल्या यादीत
हार्दिक पटेल यांच्या फक्त दोन उमेदवारांना संधी देण्यात आल्या मुळे पाटीदार
संघाने संपूर्ण राष्ट्रात निदर्शने केली. या बरोबरच राष्ट्रवादी काँग्रेस नेते
प्रफुल पटेल यांनी देखील काँग्रेस पक्षाबाबत नाराजी दाखवली. पहिली यादी जाहीर
करताना काँग्रेसने राष्ट्रवादी काँग्रेसला विचारणा केली नसल्याचा आरोप त्यांनी
यावेळी केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस यंदा स्वतंत्र निवडणूक लढण्याच्या
तैयारीत असल्याचेही पटेल यांनी स्पष्ट केले.
________________
दारूच्या दुकानाला देता येणार नाही महापुरुषांचे नाव
महापुरुष, देवी-देवता तसेच गडकिल्ल्यांचे नाव राज्यातील कोणत्याही दारुच्या दुकानाला
देता येणार नसल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लवकरच याबाबतची
अधिसूचना जारी करण्यात येणार आहे. मार्चमध्ये विधान परिषदेत राष्ट्रवादी
काँग्रेसचे आमदार अमरसिंह पंडित यांनी लक्षवेधी सूचनेद्वारे कोणत्याही दारूच्या
दुकानाला महापुरुषांचे नाव न देण्याची मागणी केली होती. राज्यातील बिअर बार, दारुचे दुकाने आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच गडकिल्यांची नावे दिल्याचे
दिसते, हा महापुरुषांचा अवमान असून राज्याच्या संस्कृतीला शोभणारे
हे चित्र नाही असे त्यांनी म्हटले होते. देशी दारुची दुकाने, बिअर बार आणि परमिट रुमला महापुरुषांची तसेच देवी- देवता आणि गडकिल्ल्यांची
नावे देता येणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
______________________
लातूर पोलिस कोठडीत गुजरातच्या व्यापार्याचा मृत्यू
११ आक्टोबर २०१७
रोजी लातूर ते मुंबई मार्गावर असलेल्या एका ट्रॅव्हल बसवर दरोडा पडला होता. त्यात
प्रवाशांचे सुमारे साडेचार लाख रुपये लुटण्यात आले होते. या प्रकरणी लातूरच्या
एमआयडीसी पोलिसांनी गुजरात येथील नरेंद्र होडियल (वय ४५) याला अटक केली होती.
त्याला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली होती. तो कोठडीत असताना त्याच्या छातीत
दुखत असल्याचे कारण सांगत पोलिसांनी त्याला लातूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल
केले होते. तेथे पोलिसांच्या ताब्यात असताना त्याचा मृत्यू झाला होता. कोठडीत
मरण पावलेल्या आरोपीचे शवविच्छेदन नांदेडच्या शासकीय रुग्णालयात केले जाते.
त्यामुळे नरेंद्र यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नांदेडच्या रुग्णालयात
हलविण्यात आला होता. लातूरच्या पोलिसांनी हृदय विकाराने मृत्यू झाल्याचे सांगितले
होते. तरी शवविच्छेदन अहवालात नरेंद्र यांचा मृत्यू पोटात अॅसिड गेल्याने
झाल्याचे स्पष्ट झाले. मृत व्यक्तीच्या भावाने पोलिसांनीच अॅसिड पाजल्याचा
आरोप केला आहे.
______________________
कोपर्डी खून प्रकरणातील दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारी युक्तिवाद
राज्यभर
गाजलेल्या कोपर्डी (ता. कर्जत) येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून खटल्यातील
दोषींना शिक्षा सुनावण्यासाठी मंगळवारपासून जिल्हा व सत्र न्यायालयात युक्तिवाद
करण्यात येणार आहे. या प्रकरणातील तिसरा दोषी नितीन गोपीनाथ भैलुमे याच्या वतीने अॅड़
प्रकाश आहेर हे प्रथम युक्तिवाद करणार आहेत. कोपर्डी खून व अत्याचार प्रकरणातील
मुख्य सूत्रधार जितेंद्र शिंदे याला १८ नोव्हेंबर रोजी न्यायालयाने कटकारस्थान, छेडछाड, अत्याचार, खून तसेच बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक
कायद्याखाली (पोक्सो) दोषी धरले. इतर दोघांना अत्याचार, खुनाच्या कटात सहभागी होणे व प्रोत्साहन देणे, तसेच पोक्सो कायद्याखाली दोषी धरण्यात आले.
कायद्यातील या कलमांसाठी जन्मठेप अथवा फाशीच्या शिक्षेची तरतूद आहे.
___________________
बँकांचे व्यवहार मराठीत करण्याचा मनसेचा इशारा
मनसेचे पुढील
आंदोलन हे बँकांमध्ये मराठी भाषेच्या आग्रहासाठी असेल, असा इशारा राज ठाकरे यांनी ठाण्यातील सभेत दिला
होता. बँकांमध्ये स्थानिक भाषेतून व्यवहार व्हायला हवेत, असा आरबीआयचा नियम आहे. परंतु, आपल्याकडे सर्रास हिंदी आणि इंग्रजीतून व्यवहार
होतात, असे ते म्हणाले होते. राज ठाकरेंच्या या
इशाऱ्या नंतर लगेचच मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले. बँकांमध्ये मराठी भाषेत व्यवहार
करावेत, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा देणारे पत्र आज पक्षाच्या
कार्यकर्त्यांनी वांद्रे-कुर्ला संकुलातील बँकांच्या कार्यालयांमध्ये दिले आहे.
अशा प्रकारच्या मागणीचे पत्र पक्षाच्या कार्यकर्त्यांनी वांद्रे - कुर्ला
संकुलातील पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक आणि
अलाहाबाद बँकेसह इतर बँकांच्या कार्यालयांमध्ये जाऊन दिले. मराठीत व्यवहार सुरू न
केल्यास मनसे स्टाइलने आंदोलन करू, असा इशाराही दिला
आहे.
