जिओ कॅप्सूल : ठळक बातम्या थोडक्यात

 मी फक्त चहा विकला देश विकला नाही - नरेंद्र मोदी


पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातमध्ये सोमवार पासून गुजरात निवडणुकांसाठी प्रचाराला सुरूवात केली. सोमवारी त्यांनी गुजरातमध्ये चार सभा केल्या. यावेळी काँग्रेसपक्षाकडून झालेल्या प्रत्येक टीकेचे उत्तर त्यांनी दिले.  भुजमधल्या पहिल्याच सभेत मोदींनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. गुजरातच्या मुलावर गुजरातमध्ये येऊनच खोटे आरोप करणाऱ्यांना गुजरातची जनता माफ करणार नाही असे मोदी म्हणाले. तसेच सरदार पटेल यांच्या काळात काँग्रेसनं गुजरातवर दुजाभाव केला. त्यावेळच्या जनतेनं ते सहन केलं. पण आजची स्थिती वेगळी आहे. आज तुम्ही असा अपमान सहन कराल का असा प्रश्न यावेळी मोदींनी केला. 'माझ्या गरिब पार्श्वभुमीमुळे काँग्रेस मला नापसंद करतं. एखादा पक्ष इतका खालच्या स्तराला जाऊ शकतो का ? हो गरिब कुटुंबातील एक व्यक्ती पंतप्रधान झाला आहे. यावरुन झालेला संताप ते लोक लपवू शकलेले नाहीत. हो मी चहा विकला, देश विकलेला नाही', असेही नरेंद्र मोदी यावेळी म्हणाले.
_________________________________


इंडोनेशियात ज्वालामुखीचा उद्रेक, ४५ विमान उड्डाने रद्द


इंडोनेशियामधील पर्यटनासाठी प्रसिध्द असलेल्या बालीमध्ये ज्वालामुखीचा उद्रेक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. चार हजार मीटर उंचीएवढा ज्वालामुखीचा उद्रेक सुरू आहे. याप्रकारामुळे डेनपसार विमानतळावरून होणारी ४५ विमान उड्डाने रद्द करण्यात आली आहेत. ज्वालामुखीतून निघालेल्या राखेमुळे विमान वाहतुकीला अडथळा जाणवत आहे. यामुळे पाच हजार पेक्षा जास्‍त पर्यटक बालीमध्ये अडकले आहेत. या परिसरात १२० ज्वालामुखींचा सौम्‍य उद्रेक सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.इंडोनेशियातील राष्ट्रीय अपत्ती निवारण समितीने म्हटले आहे की, अंगुग पर्वतावर शनिवारी तीन वेळा ज्वालामुखीची आग भडकली. आगीच्या ज्वाळा सुमारे 4,000 मीटर उंचीपर्यंत पोहोचत होत्या. समितीने म्हटले आहे की, ज्वालामुखीचा पहिला स्फोट स्थानिक वेळेनुसार सकाळी 4.30 च्या सुमारास झाला.
_________________________________


गुजरातमध्ये एका मतदारासाठी गीरच्या जंगलात मतदान केंद्र


विधानसभा निवडणुकीसाठी गुजरातमध्ये निवडणूक आयोगाची तयारी सुरु आहे. मतदारांना कोणत्याही प्रकारची समस्या न येण्यापासून रोखण्यासाठी निवडणूक आयोग महिला, दिव्यांगांसाठी विशेष व्यवस्था करत आहे. या संबंधात, सोमनाथ जिल्ह्यातील बनईज गावात केवळ एक मतदाराला मत देण्यासाठी निवडणूक आयोग मतदान केंद्र उभारणार आहे. बानेज गाव गीर जंगलामध्ये एक ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे. गावात बनेश्वर महादेव मंदिरचे एक पुजारी महंत भारतदास गुरु दर्शन असून, जे बानेज गावातील एकमेव मतदार आहेत. केवळ एका मतदारासाठी २००२पासून निवडणूक आयोग मतदान केंद्र उभारत आहे. या वेळी ५ निवडणूक अधिकारी आणि कर्मचारी येथे एका दिवसासाठी तैनात केले जातील, जेणेकरुन महंत भारतदास आपल्या मतदानाचा हक्क बजावू शकतील.
_________________________________


दक्षिण आफ्रिकेची डेमी नेल पीटर्स ठरली यंदाची मिस युनिव्‍हर्स

मिस युनिव्‍हर्स २०१७ किताब दक्षिण अफ्रिकेची डेमी नेल पीटर्सला जाहीर करण्यात आला. डेमी नेल पीटर्सला २०१६ ची मिस युनिव्‍हर्स फ्रान्‍सची आयरिस मिट्टीनेएर हिने प्रदान केला. १९७८ मध्ये दक्षिण आफ्रिकेन मिस युनिव्‍हर्स जिंकला होता. डेमी नेल पीटर्सला ९३ प्रतिस्‍पर्धी उमेदवारांचे आव्‍हान होते. अंतिम फेरीसाठी फक्त आफ्रिका, जमाईका आणि कोलंबियाने या स्‍पर्धेत मजल मारली. दक्षिण आफ्रिकेचे असलेली डेमी नेल पीटर्स व्‍यवसाय व्‍यवस्‍थापन क्षेत्रातील पदवीधर आहे. दक्षिण आफ्रिकेला ३९ वर्षांनंतर हा किताब मिळाला आहे तसाच हा दक्षिण आफ्रिकेचा दुसरा किताब आहे.  यंदाच्या मिस युनिव्‍हर्स २०१७ साठी भारताच्या श्रध्दा शशीधरने प्रतिनिधीत्‍व केले होते. श्रद्धा यामाहा फॅसिनो मिस दीवा २०१७ची विजेती आहे.
_________________________________


भारताचा श्रीलंकेवर दणदणीत विजय, अश्विनचा रेकॉर्ड


कोलकाता कसोटीत अंधुक प्रकाशामुळे विजयाची हुकलेली संधी भारताने नागपूरमध्ये साधली. नागपूर येथे झालेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात भारताने लंकेवर एक डाव आणि 239 धावांनी विजय मिळवला. भारतीय संघाकडून कर्णधार विराट कोहलीचे द्विशतक (213) आणि  मुरली विजय(128), चेतेश्‍वर पुजारा (143)  आणि रोहित शर्मा (102 नाबाद)  तिघांनी केलेली शतकी खेळी हे या सामन्याचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट ठरले. या विजयासह भारताने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे. लंकेचा शेवटचा गडी बाद करत आर. अश्विनने कसोटीमध्ये ३०० बळी पूर्ण केले. कमी कसोटी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विश्वविक्रम अश्विनने आपल्या नावावर केला. त्याने ५४ कसोटी सामन्यांत ३०० बळी घेतले. यापूर्वी कमी सामन्यांत ३०० बळी घेण्याचा विक्रम ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिलीच्या नावावर होता.
_________________________________

Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule