ठळक बातम्या वाचा ५ मिनटात

१५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान संसदेचे हिवाळी अधिवेशन


शुक्रवारी अखेर गुजरात निवडणुकांमुळे लांबणीवर पडलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखांची घोषणा झाली असून संसदेचे हिवाळी अधिवेशन १५ डिसेंबर ते ५ जानेवारी दरम्यान होणार आहे. १४ डिसेंबरला गुजरातचे दोन्ही टप्प्यातील मतदान पूर्ण झाल्यानंतरच हिवाळी अधिवेशन सुरु होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून हिवाळी अधिवेशन लांबणीवर टाकल्याने जोरदार आरोप प्रत्यारोपांचे राजकारण सुरु होते. सरकारलागुजरात निवडणुकीच्या तोंडावर काही नको असलेल्या विषयांची चर्चा टाळायची, असल्यामुळेच संसदेच्या अधिवेशनाला वेठीस धरले जात असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. एरव्ही नोव्हेंबरच्या तिसऱ्या आठवड्यात सुरु होऊन किमान चार आठवडे हिवाळी अधिवेशन चालते. यंदा मात्र तब्बल महिनाभर हे अधिवेशन पुढे गेले आहे. ख्रिसमसच्या सुट्टीदरम्यानच चालणारे हे अधिवेशन केवळ तीन आठवड्यांचे असणार आहे.

_______________________

शिवसेनेच्या राज्यमंत्र्याची आमदारकी रद्द


शिवसेनेचे आमदार आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांचे आमदारपद मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती नलावडे यांनी अपात्र घोषित केले आहे. या संदर्भात माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. खोतकर यांनी वर्ष २०१४ च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी अर्ज दाखल करण्यासाठीच्या शेवटच्या दिवशीची वेळ निघून गेल्यानंतर स्थानिक उपविभागीय अधिकाऱ्यांकडे आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे निवडणूक लढविण्यास ते पात्रच नसल्याचे या याचिकेत म्हटले आहे. आज या याचिकेवर सुनावणी झाली. खोतकर २०१४ विधानसभा निवडणुकीमध्ये केवळ २९६ मतांनी विजयी झाले होते. न्यायालयाने एक महिन्याची स्थगिती दिली असून या निर्णयाविरोधात आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांनी सांगितले.
____________________

अयोध्येतील जागेवरच राम मंदिर बांधू : भागवत


अयोध्येतील वादग्रस्त जागेवरच राम मंदिर बांधू, असा पुनरुच्चार राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केला आहे. येथे आयोजित धर्म संसदेमध्ये त्यांनी दोन हजार हिंदू संतांना संबोधित केले. त्यावेळी त्यांनी राम जन्म भूमीवरच राम मंदिर बांधणार असल्याचे स्पष्ट केले. धर्म संसदेला देशभरातील मठांचे प्रमुख आणि विश्व हिंदू परिषदेचे बडे नेते उपस्थित होते. भागवत म्हणाले, 'आपण राम मंदिर बांधू. ही काही लोकप्रियतेसाठी केलेली घोषणा नाही. तर तो विश्वास आहे आणि तो ढळणार नाही. मंदिराचा वाद कोर्टात असला, तरी अनेक वर्षांच्या बलिदानानंतर आता राम मंदिर उभारणे शक्य असल्याचे दिसू लागले आहे.' अयोध्येतील जागेवर केवळ राम मंदिरच उभारले जाईल आणखी काहीच नाही, असेही भागवत यांनी स्पष्ट केले. 

_______________________

देशाच्या अनेक भागात टोमॅटो दर शंभरीकडे


मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी झाल्याने दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागात टोमॅटोच्या दराने 80 रुपये प्रतिकिलोची पातळी गाठली आहे. पुरवठा वाढला नाही, तर टोमॅटोचे किरकोळ बाजारातले दर शंभर रुपयांवर जाऊ शकतात, असे आझादपूर भाजीपाला बाजारातील टोमॅटो व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अशोक कौशिक यांनी शुक्रवारी सांगितले. केवळ दिल्लीतच टोमॅटोचे दर वाढलेले आहेत असे नाही, तर देशाच्या अन्य बाजारपेठांतही टोमॅटोचे दर चढे आहेत. बंगळुरुमध्ये टोमॅटोचे प्रतिकिलोचे दर 45 ते 50 रुपयांवर गेले असून, मिझोरामची राजधानी ऐझवाल येथे 95 ते 100 रुपये प्रतिकिलो दराने टोमॅटो विकला जात आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश या दोन राज्यांत अवकाळी पाऊस पडल्याने सदर राज्यांतील टोमॅटोची आवक घटली आहे. याच्या परिणामी टोमॅटो दरात वाढ झाली असल्याचा दावा कौशिक यांनी केला. अवकाळीमुळे मध्य प्रदेशात 90 टक्के टोमॅटो खराब झाला असल्याची माहितीही त्यांनी दिली.

________________________

खाडाखोड असलेल्या नोटा बँकांना घ्याव्याच लागतील रिझर्व्ह बँक


सोशल मीडियावर काही दिवसापूर्वी ५०० आणि २ हजार रुपयांच्या नोटांवर लिहिले असेल तर अशा नोटा बँका घेणार नाहीत, अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या. पण या सगळ्यावर आता भारतीय रिझर्व्ह बँकेने स्पष्टीकरण दिले आहे. बँका ५०० आणि २ हजारांच्या नोटांवर काही लिहिले असेल तरी अशा नोटा घ्यायला नकार देऊ शकत नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. त्याचबरोबर ५००-२००० च्या नोटांवर काहीही लिहिले असले किंवा नोटांचा रंगही जर गेला असला तरी या नोटा बँका नाकारू शकत नसल्याचे रिझर्व्ह बँकेने सांगितले आहे. या नोटा बँका नाकारू शकत नाहीत पण ग्राहक बँकेत गेले तर त्यांना या नोटा बदलून मिळणार नाहीत पण त्यांना या नोटा आपल्या बँक खात्यांमध्ये जमा कराव्या लागतील, असेही आरबीआयकडून सांगण्यात आले आहे. नव्या नोटा बदली करण्यासाठी नियमावली आलेली नसल्यामुळे लिहिण्यात आलेल्या नोटा बदलून मिळणार नाहीत.



Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule