वाचा ठळक बातम्या थोडक्यात

२६/११ हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद मोकाट


मुंबईतील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि जमात-उद-दवाचा म्होरक्या हाफिज सईद याच्या सुटकेचे आदेश पाकिस्तान न्यायालयाने दिले आहेत. अमेरिकेने सईदच्या अटकेसाठी इनाम घोषित करून आणि भारतानेही त्याच्या दहशतवादी कृत्याबाबत सबळ पुरावे देऊनही सईद मोकाट सुटल्याने पाकिस्तान सरकारची नाचक्‍की झाली आहे. मुंबईतील दहशतवादी हल्ल्यात सुमारे 166 निष्पाप लोकांचा बळी गेला होता. हाफिज सईद आणि लष्कर-ए-तोयबाचा कमांडर झकिउर रेहमान यांनीच हल्ल्याचा कट रचल्याचे उघड झाले होते. त्यामुळे सईदला पाकिस्तानी सरकारने गेल्यावर्षी जानेवारी महिन्यापासून नजरकैदेत ठेवण्यात आले होते. सईदच्या नजरकैदेबाबत न्यायालयात पुरावे देण्यास पाकला अपयश आले आहे. त्यामुळेच न्यायालयाने सईदची सुटका करण्याचे आदेश दिले आहेत. दोन दिवसांत सईद नजरकैदेतून बाहेर येण्याची शक्यता आहे.
__________________

न्यायमूर्तींना अखेर मिळणार वेतन वाढ


सर्वोच्च न्यायालय तसेच 24 उच्च न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या वेतनात वाढ करण्याच्या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे कायदामंत्री रवीशंकर प्रसाद यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. सर्वोच्च न्यायालयातील 31, उच्च न्यायालयांतील 1079 सेवारत न्यायमूर्तींचे वेतन या निर्णयामुळे वाढणार आहे. शिवाय 2500 सेवानिवृत्त न्यायमूर्तींच्या पेन्शनमध्ये वाढ होणार असल्याचेही प्रसाद यांनी सांगितले. 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्ष्यी प्रभावाने न्यायमूर्तींना वेतन, ग्रॅज्युईटी, विविध प्रकारचे भत्ते व पेन्शनमधील वाढीचा फायदा करून दिला जाणार असल्याची माहिती रवीशंकर प्रसाद यांनी दिली. अलीकडेच सरकारने कनिष्ठ न्यायालयांतील न्यायमूर्तींच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता.
___________________

तीन दिवसांत सोन्याच्या किंमतीत ३७५ रुपयांची घसरण


दिल्लीच्या सराफा बाजारात सलग तिसऱ्या दिवशी बुधवारी सोन्याच्या किंमतीत घसरण पाहायला मिळाली. स्थानिक ज्वेलर्सकडून मागणी घटल्यानंतरही सोन्याच्या दरात ५० रुपयांची घट होत ते प्रति तोळा ३०,४०० रुपयांवर पोहोचले. व्यापाऱ्यांच्या मते स्थानिक ज्वेलर्स आणि रिटेलर्सकडूम मागणी घटल्याने सोन्याच्या किंमतीत घसरण होतेय. दरम्यान, आंतरराष्ट्रीय बाजारात मात्र सोन्याच्या किंमतीत सकारात्मक वाढ पाहायला मिळाली. जागतिक स्तरावर सिंगापूरमध्ये सोन्याच्या दरात वाढ होत ते १२८३.२० डॉलर प्रति औंसवर पोहोचले तर चांदीच्या दरात ०.३८ टक्क्यांची वाढ होत ते १२ डॉलर प्रति औंसवर पोहोचले. राजधानी दिल्लीत ९९.९ आणि ९९.५ टक्के शुद्धतेच्या सोन्याचे दर ५० रुपयांनी घसरुन अनुक्रमे ३०,४०० आणि ३०,२५० रुपये प्रति तोळ्यावर बंद झाले. गेल्या दोन सत्रात सोन्याच्या दरात ३२५ रुपयांची घसरण पाहायला मिळाली.
_______________________

सुखोईतून ब्राह्मोस क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी


बुधवारी भारतीय हवाई दलाच्या सुखोई ३०MKI या जेट विमानातून भारत आणि रशिया यांची संयुक्त निर्मिती असणारे सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्र ब्राह्मोसची यशस्वी चाचणी करण्यात आली. बंगालच्या उपसागरात सुमारे अडीच टन वजनाच्या या क्षेपणास्त्राची चाचणी घेण्यात आली. आजवर या क्षेपणास्त्रांच्या चाचण्या उपग्रह प्रक्षेपण वाहनाच्या माध्यमांतून घेण्यात आल्या आहेत. पण जेट विमानाचा भारताने पहिल्यांदाच अशा प्रक्षेपण वाहनासारखा वापर करुन क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेऊन इतिहास घडवला. भारताच्या अंतराळ संशोधन कार्यातील मध्यम पल्ल्याच्या ब्राह्मोस क्षेपणास्त्राची चाचणी मैलाचा दगड मानला जात आहे. दहशतवाद्यांची ठिकाणे अचूकरित्या हवेतून जमिनीवर मारा करण्याची क्षमता असणारे हे क्षेपणास्त्र भेदू शकते. या क्षेपणास्त्रात हवेतून दहशतवाद्यांचे असे अड्डे उध्वस्त करण्याबरोबरच जमिनीखालील बंकर्सही उद्धस्त करण्याची क्षमता आहे.
_______________________

कोल्हापूरची अनुजा भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार


बांगलादेश संघाबरोबर भारतात होणाऱ्या वनडे आणि टी २० मालिकेसाठी भारताच्या संघाची घोषणा बुधवारी करण्यात आली. भारतीय महिला संघाच्या कर्णधारपदाची धुरा कोल्हापूरच्या अनुजा पाटीलकडे सोपवण्यात आली आहे. ती भारताच्या टी २० तसेच वनडे संघाचे नेतृत्व करणार आहे. या पूर्वी अनुजाने टी २० सामन्यात भारतीय महिला संघाचे प्रतिनिधीत्व केले आहे. आज भारतीय नियामक मंडळाने भारतीय संघाची घोषणा केली. भारतचा संघ बांगलादेशच्या संघाबरोबर तीन वनडे आणि तीन टी २० सामने खेळणार आहे. यातील वनडे सामने हुबळी येथे तर टी २० सामने बेळगाव येथे होणार आहेत. महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पहिल्यांदाच दोन्ही देशातील संघांची मालिका खेळवण्यात येणार आहे.


Popular posts from this blog

जिओ कॅप्सूल : ५ मिनटात वाचा ठळक बातम्या थोडक्यात

Top stories on 23rd October in a capsule