१५ नोव्हेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
दाऊदनी दिली पुन्हा मुंबई उडवण्याची धमकी
मंगळवारी
दाऊदच्या मुंबईतील तिन्ही मालमत्तांचा लिलाव करण्यात आला. याबाबत दाऊदचा एक साथीदार
उस्मान चौधरी याने रात्री उशिरा एका वृत्तवाहिनीला फोन केला आणि दाऊदची मालमत्ता कोणी ताब्यात घेतली तर मुंबईत १९९३ च्या बॉम्बस्फोटाची पुनरावृत्ती घडवून आणू. मुंबईत पुन्हा बॉम्बस्फोट करू,
अशी धमकी दिली. दाऊदच्या साथीदाराने दिलेल्या या नव्या
धमकीमुळे मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. २००२ आणि २०१५ मध्ये दाऊदच्या मालमत्तांचा लिलाव झाला होता. हा
लिलाव होऊ नये म्हणून तेव्हा दाऊदचे साथीदार सक्रिय झाले होते. त्यावेळी कोणत्याही परिस्थितीत भाईची मालमत्ता दुसऱ्यांच्या ताब्यात जाऊ नये,
असे आदेशच दाऊदचा भाऊ अनीस आणि छोटा शकीलने त्यांच्या साथीदारांना दिला होता. बोली लावणाऱ्यांना धमक्याही देण्यात आल्या होत्या.
_________________
ऊस दर आंदोलनाला हिंसक वळण
सरकारने ऊस दरात लक्ष घालावे, अशी मागणी करणा-या शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी रस्त्यावर उतरुन जाळपोळ केली. त्यामुळे आंदोलनकर्त्या शेतक-यांवर व शेतकरी संघटनेच्या नेत्यांवर पोलिसांनी बुधवारी
(15 नोव्हेंबर)
गोळीबार केला. यात एका शेतक-याच्या छातीत छरर्रा घुसला. हा शेतकरी गंभीर जखमी झाला असून, दुस-या शेतक-याच्या हातात छरर्रा घुसला आहे. पोलिसांनी लाठीमार तसेच अश्रूधुराचा मारा केला. अहमदनगर जिल्ह्यातल्या शेवगावमध्ये आणि पैठणमध्ये उसाला 3100 रूपयांचा दर मिळावा यासाठी आंदोलन पुकारण्यात आले होते. आंदोलकांनी रस्त्यांवर टायर जाळून आपला रोष व्यक्त केला. तसंच अडवलेल्या वाहनांच्या चाकांची हवाही सोडली. शेगाव मध्ये दोन बस पेटवण्यात आल्या.
__________________
बेस्टच्या तिकिट दरांमध्ये भरमसाट वाढ
आर्थिक गर्तेत असलेल्या बेस्ट प्रशासनाने बस तिकीट आणि पास दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला असल्यामुळे येत्या काळात मुंबईकरांचा बस प्रवास महागण्याची चिन्ह आहेत. काल बेस्ट समितीकडून बसभाडे आणि पास दरवाढीला मंजुरी देण्यात आल्यामुळे बेस्ट तिकिटावर एक ते १२ रुपये आणि मासिक पाससाठी ४० ते ३५० रुपये जास्त मोजावे लागणार आहेत. सहा आणि त्यापुढील किलोमीटर अंतरासाठी तिकीट आणि पासतील दरवाढ ही लागू होईल. बेस्ट भाडेवाढ मुंबई पालिकेच्या अंतिम मंजुरीनंतरच लागू होईल, असे बेस्ट समितीकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र तूर्तास तरी मुंबईकरांच्या डोक्यावर तिकीट दरवाढीची टांगती तलवार आहे.
____________________
अमरावती - तुरीचे उभे पीक जळून खाक
धामणगाव रेल्वे शेजारी असलेल्या शेतात आग लागल्यानं दीड एकारातील तूर जळून खाक झाली आहे. धामणगाव तालुक्यातील जळगाव आर्वी येथे बुधवारी ही घटना घडली. जळगाव आर्वी येथील बिसन मोतीराम सहारे यांच्या मालकीची तीन एकर शेती आहे. दरवर्षी या शेतात ते तुरीचे पीक घेतात. यंदा दीड एकरात म्हाडा तुरीची पेरणी केली होती. दोन दिवस मजूर न मिळाल्याने ही तूर सोंगण्यात आली नाही. आज बाजूच्या धुया-याला अचानक आग लागली या आगीने उग्र रूप धारण केले, शेतक-याने त्यावर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. पण आगीवर नियंत्रण मिळवणं शक्य झाले नाही. यामुळे शेतातील पूर्ण तूर जळून खाक झाली.
____________________
हार्दिक पटेलचे आणखी चार व्हिडिओ व्हायरल
ऐन गुजरात निवडणुकीच्या रणधुमाळीत पाटीदार आरक्षण आंदोलनाचा नेता हार्दिक पटेल याचे दोन सेक्स व्हिडिओ व्हायरल झाल्यानं खळबळ उडालेली असतानाच त्याचे आणखी चार व्हिडिओ व्हायरल झाल्याचं सांगण्यात येतं. मात्र हे सर्व व्हिडिओ बनावट असून याप्रकरणी आपण न्यायालयात जाणार असल्याचा इशारा हार्दिकने दिला आहे. मात्र हे सगळे व्हिडिओ खरे असल्याचा दावा अजून कोणीही केलेला नाही. हे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हे भाजपचं षडयंत्र असल्याचा आरोप हार्दिकनं केला होता. २२ वर्षाच्या 'विकासा'चा भांडाफोड झाल्यामुळे भाजप २३ वर्षाच्या मुलाच्या मागे लागली आहे. याप्रकरणी आपल्या वकिलाशी संपर्क साधून कायदेशीर कारवाई करणार असल्याचंही हार्दिकनं सांगितलं.
