२५ ऑक्टोबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
कर्जमाफीत मोठा घोळ; शेतकऱ्यांची दुर्दशा कायम
शेतकऱ्यांच्या बॅंक
खात्यात पैसै जमा होण्याआधीच सरकारने मोठ्या उत्साहात कर्जमाफी प्रमाणपत्रांचेही वाटप केले. प्रत्यक्षात मात्र कर्जमाफीत मोठा घोटाळा झाल्याचे पुढे येत आहे.
ऑनलाईन आलेल्या अर्जांपैकी ३० ते ३५ टक्के माहिती चुकीची असल्याचं समोर आलं आहे. विशेष म्हणजे एकाच आधार नंबरवर शंभरहून अधिक शेतकऱ्यांची नावं असल्याची यादी झी २४
तासच्या हाती लागली आहे. बँकांनी दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष माहिती याचा ताळमेळच बसत नसून, शेतकऱ्यांच्या नावे
असलेलं कर्ज आणि त्यावरील व्याज या माहितीत तफावत आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र देण्यात आली मात्र अद्यापही त्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. याबाबत
दक्षता घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीनं बँकिंग समितीची बुधवारी बैठक बोलवली होती. एकीकडे कर्जमाफी जाहीर होऊनही एकही रुपया खात्यात जमा झालेला नाही तर दुसरीकडे
शेतीमालाचा भाव सुद्धा घसरला आहे. यामुळे बळीराजाच्या डोक्यावर अद्याप टांगती तलवार आहे.
_______________________________________________
मराठा तरुणांना १० लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज
अण्णासाहेब
पाटील आर्थिक विकास महामंडळामार्फत मराठा समाजातील तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. तसेच १० लाख
रुपयांपर्यंतच्या कर्जावर व्याजाची सवलत देण्यात येणार आहे. मंत्रिमंडळ उपसमितीची मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात ५ ऑक्टोबरला
झालेल्या पहिल्या बैठकीत यासंदर्भात चर्चा झाली आणि मराठा समाजाच्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी कार्यवाही सुरु करण्याचा निर्णय झाला. मराठा समाजाच्या विविध मागण्यांच्या पुर्ततेसाठी पाठपुरावा करण्याकरिता समितीतील सदस्यांना विषय वाटून देण्यात आले आहेत. सुमारे
किमान दहा हजार तरुणांना या व्याज सवलतीचा फायदा होणार आहे. केंद्र शासनाकडून कौशल्य विकास प्रशिक्षणसाठी मिळालेल्या ४५० कोटी रुपयांच्या निधीतून प्रशिक्षण देण्यात येणार असून, ३
लाख तरुणांना त्यातून प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे.
_______________________________________________
सेना-मनसेची शर्यत सुरूच
महाराष्ट्र
नवनिर्माण सेनेचे इंजिन सोडून शिवसेनेच्या शिवबंधनाता अडकलेल्या सहा पैकी ४ नगरसेवकांची घरवापसी होण्याची शक्यता आहे. या चार
नगरसेवकांनी पुन्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत येण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचा दावा मनसेने केला आहे. यामध्ये परमेश्वर कदम,
हर्षला मोरे, दत्ताराम नरवणकर, अर्चना
भालेराव यांचा समावेश असल्याची चर्चा आहे. या नगरसेवकांशी
संपर्क झाला असून, त्यांच्याशी चर्चा सुरु आहे.
तसेच या नगरसेवकांनी राज ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे, असाही दावा मनसेकडून करण्यात आला आहे.
अंधेरीतील एका हॉटेलमध्ये या चारही नगरसेवकांशी चर्चा सुरू असल्याचा दावा मनसेकडून करण्यात येत आहे. मात्र शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी हे साफ
फेटाळून लावले आहे. मनसेतून सेनेत आलेले सर्व नागरसेवक सेनेतच राहणार असल्याचा खुलासा त्यांनी बुधवारी केला. भावा-भावांमध्ये सुरु असलेल्या या शर्यतीत आता कोण जिंकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
_______________________________________________
शिक्षकांची पगारवाढ विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेनुसार होणार
महाराष्ट्रातील शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेवर शिक्षकांची पगारवाढ ठरवण्याचा निर्णय घेतल्यामुळे राज्यभरातील शिक्षक संघटनांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. १२ ते २४ वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या प्राथमिक (इयत्ता पहिली ते पाचवी), उच्च प्राथमिक (सहावी ते आठवी) शिक्षकांना ही अट लागू असेल. संबंधित शाळेला राष्ट्रीय मानक आणि मूल्यमापन (शाळा सिद्धी) उपक्रमात
‘अ’ श्रेणी मिळाली असेल, तरच शिक्षकांना उच्च वेतन असलेली बढती मिळू शकते. ही श्रेणी शाळेतील पायाभूत सुविधा, विद्यार्थ्यांची कामगिरी, शैक्षणिक गुणवत्ता यासारख्या बाबींवर शाळांना मिळणारी अवलंबून असते. ८० टक्क्यांपेक्षा अधिक माध्यमिक शाळेच्या शिक्षकांसाठी (इयत्ता नववी आणि दहावी) विद्यार्थ्यांचा सक्सेस रेट असायला हवा. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे पात्र शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येईल. पण हे निकष काढून टाकण्याची मागणी राज्यभरातील शिक्षकांनी केली आहे. भाजपच्या शिक्षक आघाडीने शिक्षणमंत्री विनोद तावडे यांना 'हा जी आर रद्द करा नाहीतर आंदोलन करू' असा इशारा दिला आहे.
_______________________________________________
भारतात फळे, भाज्यांची प्रचंड नासाडी
एका स्वयंसेवी संघटनेने भारतातील धान्य नासाडी संदर्भात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली तेव्हा देशात ४० हजार टन धान्य साठवण्याची व्यवस्था नसल्यामुळे वाया जाते असे निष्पन्न झाले होते. आता हीच स्थिती दूध, भाज्या आणि फळांच्या बाबतीत आली आहे. शेवटी धान्य हे काही दुधासारखे नाशवंत नसते म्हणून धान्याची नासधूस तुलनेने कमी असते. फळे, भाज्या आणि दूध हे नाशवंत असल्यामुळे त्यांची साठवणूक करण्याची सोय नसली म्हणजे धान्यापेक्षाही अधिक नासाडी होते. असोचेम या संघटनेने याबाबत एक पाहणी केली असता असे आढळून आले की, आपल्या देशात या तीन नाशवंत मालाचे जेवढे उत्पादन होते त्याच्या ४० ते ५० टक्के एवढे उत्पादन वाया जाते, नासते आणि कुजते. भारत देशाचे हे नुकसान ४४० अब्ज डॉलर्स म्हणजेच २४ लाख कोटी रुपये एवढे आहे. देशाने उत्पादन वाढवण्याचा प्रयत्न केला पण साठवण्याची योजना आखली नाही त्याचाच हा परिणाम आहे.
