६ सप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
देशात गोरक्षणाच्या नावाखाली हिंसा करणाऱ्यावर कडक करवाई करा, असे निर्देश
बुधवारी सर्वोच्च न्यायालयाने केंद्र आणि राज्य सरकारांना दिले. त्याचबरोबर यांसारख्या हिंसेच्या घटनांवर लक्ष ठेवण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याची नेमणूक करण्याच्या सूचना राज्य सरकारांना न्यायालयाने दिल्या आहेत. कायदा हातात घेणारे आणि स्वतःलाच कायदा समजणाऱ्यां विरोधात कठोर पावले उचलणे गरजेचे असल्याचे न्यायालयाने म्हटले. या संदर्भात याचिका दाखल करणाऱ्यांनाही न्यायालयाने फटकारले. या विषयाचे राजकारण न करण्याच्या सूचना याचिका कर्त्यांना देण्यात आल्या. तसेच ईद दरम्यान मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या जनावरांच्या कत्तलीविषयीही तुम्ही याचिका दाखल केली पाहिजे, असे न्यायालयाने म्हटले आहे.
राज्यभरात गणेश विसर्जन सोहळ्यादरम्यान 15 हून अधिक जणांचा मृत्यू
राज्यात एकीकडे गणपती बाप्पांना भावपूर्ण वातावरणात निरोप देत असतानाचा, दुसरीकडे विसर्जन सोहळ्यादरम्यान राज्यातील विविध भागात पाण्यात बुडून 15 हून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. औरंगाबाद मधील शिवणारी तलावात बुडून तीन मुलांचा मृत्यू झाला, तर २ जण अद्याप बेपत्ता आहेत, पिंपरी-चिंचवड मधील मुळा नदीत दोन मुले बुडाली, पुण्यात वडकी तलावात २ तरुण बुडाले, नाशिकमध्ये दोन वेगळ्या घटनेत ५ तरुण मरण पावले, जळगाव मध्ये दोन, बीड मध्ये एक तर
नगर मध्येही एक जण
बुडून मृत्यू पावला. तसेच लालबागच्या बंदोबस्ता दरम्यान अचानक चक्कर येऊन पडून एका पोलिसाचा मृत्यू झाला. भुसावळ शहरात मिरवणुकीदरम्यान झालेल्या वादात एका १९
वर्षीय युवकावर चाकूने हल्ला करण्यात आला. रुग्णालयात पोहोचण्या आधीच तरुणाचा मृत्यू झाला.
महाराष्ट्रात दर तासाला ५५ अपघात तर १७ जणांचा मृत्यू
२०१६ सालातल्या अपघातांची आकडेवारी रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाने जाहीर केली. या
आकडेवारी प्रमाणे महाराष्ट्रात गेल्या वर्षी एकूण ४ लाख ८० हजार ६५२ अपघात नोंदवले गेले आहेत. यामध्ये १ लाख ५० हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. या प्रमाणे महाराष्ट्रात दर तासाला ५५
अपघात होतात तर दर
तासाला १७ जणांचा मृत्यू होतो असं या
आकडेवारीतून स्पष्ट होतं आहे. २०१५ च्या तुलनेत रस्ते अपघातांचं प्रमाण ४.१ टक्क्यांनी कमी झाल्याचंही या
आकडेवारीवरून स्पष्ट होतं आहे. मात्र अपघातात मृत्यू होणाऱ्यांच्या संख्येत मात्र ३.२ टक्क्यांची वाढ झाली आहे. देशातल्या एकूण अपघातांपैकी ८६ टक्के अपघात हे केवळ १३
राज्यांमध्ये झालेत. या १३ टक्क्यांमध्ये महाराष्ट्राचा समावेश आहे.
पहिल्याच दिवशी लखनऊ मेट्रोमध्ये बिघाड
मोठा गाजावाजा करून मंगळवारी उद्धाटन करण्यात आलेल्या लखनऊ मेट्रोमध्ये पहिल्याच दिवशी बिघाड झाला. मेट्रोत बिघाड झाल्याने जवळपास एक तास आलमबाग स्टेशनवर मेट्रो उभी होती. त्यानंतर दुसऱ्या मेट्रोच्या मदतीने बिघाड झालेली मेट्रो हटवण्यात आली. तसंच बिघाड झालेल्या मेट्रोत असणाऱ्या प्रवाशांना शिडीच्या मदतीने मेट्रोतून उतरवण्यात आले. दोन वर्ष अकरा महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर लखनऊ मेट्रो सुरू झाली, पण
मेट्रो सुरू झाल्याच्या पहिल्याच दिवशी मोठ्या उत्साहाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला. तांत्रिक बिघाडामुळे मेट्रो विस्कळीत झाली असल्याचं स्पष्टीकरण लखनऊ मेट्रोच्यावतीने देण्यात आले आहे.
बलात्कार पीडित मुलीला गर्भपात करण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी
सुप्रीम कोर्टाने बुधवारी एका स्पेशल केस मध्ये 31 आठवड्यांच्या अल्पवयीन बलात्कारीत पीडितेला गर्भपातासाठी परवानगी दिली आहे. या मुलीचं अल्प वय आणि तिचं भविष्य लक्षात घेऊन या गर्भपाताची परवानगी दिली असली तरी या गर्भपातादरम्यान, तिच्या जीवाला कोणताही धोका निर्माण होणार नाही, याची विशेष खबरदारी घेण्याचे आदेशही सुप्रीम कोर्टाने दिलेत. सर्वोच्च न्यायालयानं या
अल्पवयीन मुलीच्या आरोग्याची वैद्यकीय चाचणी घेण्यासाठी एक
मेडिकल बोर्डही स्थापन केलं आहे. या मेडिकल बोर्डाच्या सल्ल्यानंतरच मुलीला गर्भपात करता येणार आहे. प्रचलित कायद्यानुसार 20 आठवड्यानंतर महिलेला गर्भपात करण्यासाठी प्रतिबंध आहे. पण स्पेशल केस म्हणून सुप्रीम कोर्टाने या 31 आठवड्यांच्या गर्भपाताला परवानगी दिलीय.
