२१ सेप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
नारायण राणे यांचा काँग्रेसला घटस्फोट
महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी अखेर गुरुवारी काँग्रेस पक्षाचा आणि आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या सह त्यांचे खंदे समर्थक असलेले दत्ता सामंत यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी देखील काँग्रेस सदस्यत्वाचा आणि पदाचा राजीनामा दिला. राजकीय कारकीर्दीतील नारायण राणे यांचे हे
दुसरे बंड होते. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिवसेनेमधून नारायण राणे यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली होती. स्थानिक शाखाप्रमुख ते
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री असा प्रवास करणा-या नारायण राणेंची महत्वकांक्षी आणि आक्रमक नेते अशी ओळख आहे. काँग्रेस सोडल्यानंतर आता कोणत्या पक्षात जाणार याबाबतचा निर्णय त्यांनी राखीव ठेवला आहे. दोन आठवड्या नंतर याबाबतची माहिती ते जाहीर करतील असे ते
गुरुवारी झालेल्या प्रेस कॉन्फरेन्स मध्ये म्हणाले.
राज ठाकरेंची 'राजगर्जना'
आता फेसबुकवर
राज ठाकरे यांनी गुरुवारी स्वत:च्या फेसबुक पेजचे (www.facebook.com/RajThackeray) अनावरण केले. या कार्यक्रमात राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार टीका केली. धोरण लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी
तसेच माहित नसलेल्या गोष्टी समोर आणण्यासाठी फेसबुक पेजचा वापर करणार असल्याचे राज यांनी सांगितले. यावेळी त्यांनी दाऊद ला
स्वतःहून भारतात यायची इच्छा असून तोच या
साठी केंद्र सरकार बरोबर सेटलमेंट करत असून आता भाजपा याचे श्रेय निवडणुकीवेळी घेणार असे व्यक्त केले. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ट्विटर वरील ४८ टक्के फॉलोवर्स फेक आहेत तर काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे ५४ टक्के फॉलोअर्स फेक असल्याचे राज यांनी सांगितले. राज ठाकरे यांनी फेसबुक पेज सुरु केल्यानंतर ते लाईव्ह असताना अवघ्या काही तासातच त्याला ४ लाखाहून अधिक लाईक्स मिळाले होते.
रेल्वे कर्मचाऱ्यांना मिळणार ७८ दिवसांचा बोनस
आपल्या कर्मचाऱ्यांना ७८
दिवसांचा बोनस भारतीय रेल्वेने जाहीर केला असून या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आदींसह अर्थमंत्री अरूण जेटली, रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री या बैठकीला उपस्थित होते. रेल्वेच्या १२.३० लाख कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा होणार आहे. उत्पादकतेवर देण्यात येणाऱ्या बोनससाठी वेतनाची मर्यादा ही ७ हजार रूपयाइतकी निश्चित करण्यात आली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८
दिवसांच्या बोनसपोटी १७९५१ रूपये मिळणार आहेत. दसऱ्याच्या आत कर्मचाऱ्यांना बोनसची ही रक्कम दिली जाण्याची शक्यता असल्यामुळे २,२४,५४५ कोटी रूपयांचा बोजा रेल्वेवर पडणार आहे.
राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा
घटस्थापनेच्या मुहुर्तावर राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी राज्य सरकारने खुशखबर दिली आहे. गुरूवारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात राज्य सरकारकडून ४ टक्क्यांची वाढ करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली. ही पगारवाढ १ जानेवारी २०१७ पासून लागू होणार आहे. यापैकी ऑगस्टपासूनचा वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना रोख स्वरूपात दिला जाईल. तर त्यापूर्वीच्या ७ महिन्यांमधील वाढीव महागाई भत्ता कर्मचाऱ्यांना कशाप्रकारे द्यायचा, याबाबत स्वतंत्र आदेश काढण्यात येणार आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात यापूर्वी एप्रिल महिन्यातही सात टक्क्यांची वाढ करण्यात आली होती. त्यावेळी महागाई भत्ता १३२ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. आता त्यामध्ये आणखी चार टक्क्यांची भर पडली आहे. राज्य सरकारच्या तब्बल १६ लाख कर्मचारी आणि ६ लाख निवृत्ती वेतनधारकांना वाढीव महागाई भत्त्याचा फायदा होणार आहे.
अहमदनगरमध्ये तलावाचा बांध फुटून गाव उध्वस्त
मुसळधार पावसामुळे अहमदनगर जिल्ह्यातल्या अरणगावमधला पिंपळडोह हा तलाव काल रात्री अचानक फुटला. त्यामुळे आलेल्या पुरात तब्बल ३२ जण
अडकले होते. या तलावाच्या पाण्यानं वाळूंज आणि पारगाव या दोन गावांना धोका निर्माण झाला होता. सुरुवातीला सैन्याच्या जवानांनी या गावकऱ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, मात्र बोट नसल्यानं त्यांना बाहेर काढण्यात यश
आलं नाही. यानंतर एनडीआरएफचं एक पथक इथं दाखल झालं आणि त्यांनी पुरात अडकलेल्या गावकऱ्यांना बाहेर काढलं. सध्या सगळे गावकरी सुरक्षित असल्याचा दावा प्रशासन करत आहे. बचाव पथकाच्या तत्परतेमुळे यात कोणतीही दुर्दैवी घटना घडली नाही मात्र गावातील ३५
कुटुंबाची घरे उध्वस्त झाली आहेत.

