१४ सप्टेंबरच्या ठळक बातम्या थोडक्यात
बुलेट ट्रेनचे वैशिष्ट्ये
मुंबई अहमदाबाद या देशातील पहिल्या बुलेट ट्रेनच्या कामाचे भूमीपूजन गुरुवारी, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते गुजरात, अहमदाबाद येथे संपन्न झाले. भारतातील ही पहिली बुलेट ट्रेक ३५० किलोमीटर प्रती तास वेगाने धावू शकणार आहे. या ट्रेनच्या माध्यमातून मुंबई अहमदाबाद हे ५०८ किलोमीटरचे अंतर अवघ्या तीन तासांत कापता येणार आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा एकूण खर्च सुमारे एक लाख १० हजार कोटी रुपये असून, त्यासाठी जपान सरकारने ८८ हजार कोटी रुपये ०.१ टक्के व्याज दराने भारताला दिले आहेत. ताशी ३२० ते ३५० किलोमीटर प्रती तास वेगाने ही ट्रेन धावणार आहे. ही ट्रेन १२ स्टेशनवर थांबेल व प्रत्येक स्टेशनवर ही ट्रेन १६५ सेकंद थांबेल व यात एकेवेळी ७५० प्रवासी प्रवास कारु शकतील.
बुलेट ट्रेनवर टीकेचा वर्षाव
बुलेट ट्रेन हा भारतातील सर्वात महत्वाकांक्षी प्रकल्प असल्याचे जाहीर केले असले तरी त्याबाबत मिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. मुंबईकर आणि विरोधी पक्षांकडून यावर टीकेचा वर्षाव होत आहे. मुंबईकरांनी लोकल आपली नाराजी व्यक्त करत आधी लोकल ट्रेनची स्थिती सुधारा आणि मग बुलेट ट्रेन सुरु करा असे मत व्यक्त केले आहे. तसेच बुलेट ट्रेन ही गरीब किंवा सामान्य वर्गासाठी नाहीतर श्रीमंतांसाठी आहे असेही मत व्यक्त करण्यात आले. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुलेट ट्रेनसाठी महाराष्ट्राच्या तिजोरीतुन घेतलेल्या ३० हजार कोटी रुपये वापरण्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. तसेच काँग्रेस पक्षाने मुंबई-अहमदाबाद च्या मध्ये धावणाऱ्या बुलेट ट्रेनचे उदघाटन गुजरात मधेच का करण्यात आले, यामागे येणाऱ्या निवडणुकीची तैयारी असल्याची टीका केली आहे. तसेच मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबईचे आर्थिक महत्व कमी करण्यासाठी हा प्रकल्प राबविण्यात येत असल्याची टिका केली आहे.
लालबागच्या राजावर ४.८६ लाखांचा दंड
सालाबादप्रमाणे यंदाही बृहन मुंबई महानगर पालिकेवर रस्त्यावर खड्डे पडल्याकारणाने, पंडाल बांधताना रस्ता खराब करण्यासाठी व भक्तांच्या रांगा लावण्यासाठी डिव्हायडर तोडण्यासाठी हा दंड आकारला गेला आहे. प्रत्येक खाद्यासाठी र. २००० असा दंड बीएमसी ने आकारला आहे. गेल्यावर्षी महानगरपालिकेने मंडळावर ४.२६ लाखांचा दंड आकारला होता आणि तो मंडळाकडून भरण्यातही आला होता मात्र या वर्षी मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी या
दंडाबाबत विरोध दर्शविला आहे. लालबागचा राजा त्या परिसरातील एकुलते एक मंडळ नसून अनेक मंडळ तिथे उभारण्यात येतात. लालबागच्या राजाची भक्तांची रांग लांब पर्यंत जात असल्याने बीएमसीने आम्हालाच दोषी ठरविल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. या
वर्षी बीएमसी कडे परवानगीसाठी २,०८५ मंडळांचे अर्ज आले होते त्यातून एकूण ११६५ मांडप उभारण्यात आले होते.
मोहन भागवत यांचे पुरोगामी हिंदुत्ववादी भाषण
भाजपचे सरचिटणीस राम माधव यांच्या 'इंडिया फाउंडेशन'च्या कार्यक्रमात परदेशातील विविध मिशनच्या ५० प्रतिनिधींबरोबर नवी दिल्ली येथे चर्चा करताना राष्ट्रीय स्वयं सेवक दलाचे अध्यक्ष डॉ. भागवत यांनी हिंदुत्वाच्या पुरोगामी परिभाषा मांडली. यावेळी त्यांनी कोणी काय पेहराव करावा किंवा कोणी काय खायला पाहिजे', हे हिंदूत्व ठरवू शकत नाहीत असे मत व्यक्त केले. तसेच सोशल मीडियातून होणाऱ्या ट्रोलिंग या प्रकारास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विरोध आहे. आक्रमकता दाखविणाऱ्यांसोबत संघ नाही असेही भागवत यांनी सांगितले. संघ भाजपला चालवत नाही किंवा भाजप संघाला चालवत नाही. ते स्वतंत्र राहून एकमेकांच्या संपर्कात असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
१ लाख ५५ हजार पोस्ट आफिस बनणार पेमेंट बँक
आर्थिक समावेशकतेबद्दल संयुक्त राष्ट्रसंघाच्या कार्यक्रमात आयपीपीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी एपीसिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार इंडियन पोस्ट ऑफिस लवकरच पेमेंट बँक सेवा सुरू करणार आहे. यामुळे आता देशाच्या सर्व 1.55 लाख पोस्ट ऑफिसमध्ये भरणा करणे सोपं होणार आहे. मार्च 2018 पर्यंत पोस्ट बँक देशाच्या प्रत्येक जिल्ह्यात असेल आणि 2018 च्या अखेरीस देशातील सर्व 1.55 लाख टपाल कार्यालयांमध्ये आणि ग्रामीण पोस्ट ऑफिसच्या कार्यालयातील कर्मचाऱ्यांकडे यासाठी सर्व उपकरण मिळतील. जानेवारीच्या सुरुवातीला खाजगी क्षेत्रातील कंपनी भारती एअरटेलने एअरटेल पेमेंट बँक सुरू केले होते. याच्या माध्यमातून ते देशभरातील 2.5 लाख जणांपर्यंत पोहोचले, अशी माहिती एपिसिंह यांनी दिली आहे.
