२४ ऑगस्टच्या ठळक बातम्या थोडक्यात
व्यक्तिगत गोपनीयता मूलभूत अधिकार : सर्वोच्च न्यायालय
सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी व्यक्तिगत गोपनियता हा कलम 21 भाग 3 अंतर्गत एक
मुलभूत अधिकार असल्याचा निर्णय दिला आहे. 9 न्यायमूर्तींच्या सदस्यीय खंडपीठाने हा निर्णय एकमताने दिला आहे. 2012 साली केंद्र सरकारने आधार कार्डसाठी बायोमेट्रिक डाटा लिंकींगची मोहिम हाती घेतली होती. लोकांची व्यक्तीगत माहिती विचारणे हा व्यक्तीगत गोपनीयतेच्या कायद्याचं हनन करत आहे अशी एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली गेली होती. या
निर्णयानंतर आधार कार्डच्या वैधतेची तपासणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाचं 5 न्यायमूर्तींचं खंडपीठ आता व्यक्तिगत गोपनीयतेचं हनन आधारमध्ये माहिती घेताना झालं आहे की नाही याचा अभ्यास करणार आहे. या निर्णयाचा समलैंगिकतेवर भाष्य करणाऱ्या कलम 377 वर परिणाम होऊ शकतो. तसंच टेलिमार्केटिंगमध्ये लोकांची वैयक्तिक माहिती शेअर करणं तसंच बॅँकिंगसाठी पर्सनल डाटा मागणं यावर परिणाम होणार आहे.
स्वाईन फ्लूने देशभरात १०९४ मृत्यू
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीप्रमाणे देशभरात स्वाईन फ्लूने आठ महिन्यात १ हजार ०९४ जणांचा मृत्यू झाला आहे तर
गेल्या ३ आठवड्यांत ३४२ जणांचा यामुळे मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रात आणि गुजरात यामुळे सर्वाधिक बळी गेल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे. महाराष्ट्रात स्वाईन फ्लूने आतापर्यंत ४३७ तर गुजरातमध्ये २६९ जणांचा मृत्यू झाला आहे. याच बरोबर राजस्थान, केरळ, दिल्ली या राज्यांमध्ये देखील स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या अधिक आहे. कर्नाटक आणि तामिळनाडू या
राज्यांमध्ये स्वाईन फ्लूची लागण झालेल्यांची संख्या २ हजार ८०५ आणि २ हजार ९५६ इतकी आहे. मात्र या
दोन्ही राज्यांमध्ये स्वाईन फ्लूने मृत्यू झालेल्यांची संख्या केवळ १५ इतकी असल्याचे मंत्रालयाने म्हटले आहे.
२०० रुपयांची नोट शुक्रवारपासून चलनात
रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) उद्या (शुक्रवार २५ ऑगस्ट) २०० रुपयांची नवीन नोट चलनात आणणार आहे. बँकेने याबाबतची अधिसूचना जाहीर केली होती. त्या प्रमाणे २०० रुपयांची नवी नोट पिवळ्या रंगात असेल. ही नोट ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात चालनात येण्याची शक्यता दर्शवली गेली होती. आरबीआय च्या
सूत्रांच्या माहितीनुसार, २०० रु. च्या नोटेचे दोन फायदे आहेत. मार्केटमध्ये कमी किमतीच्या नोटा वाढतील. तसेच सुट्या पैशांचा अभाव फारसा राहणार नाही. तसेच काळ्या पैशाला आळा बसण्यास मदत होईल. भारतात पहिल्यांदाच २०० रुपयांची नोट उद्यापासून चलनात येणार आहे.
राम रहिम यांच्यावरील खटल्यावर शुक्रवारी सुनावणी
15 वर्षांपूर्वी हरयाणाच्या आश्रमात दोन महिलंवर बलात्कार करण्याचा आरोप डेरा सच्चा सौदाचे गुरुमित राम रहिम यांच्यावर करण्यात आला होता. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष न्यायालय शुक्रवारी निकाल सुनावणार आहे. डेरा सच्चा सौदाचे सुमारे ५०
हजार समर्थक पंचकुलामध्ये पोहोचले आहेत. पंचकुलच्या डेरा सच्चा सौदा आश्रमात पेट्रोल आणि हत्यारं साठवल्याचा पुरावा मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. सुरक्षेसाठी न्यायालयाच्या आवारात सुमारे ५०० पोलीस कर्मचारी नेमण्यात आले आहे. तर
शहरात सुमारे दोन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. शहरातील आपातकालीन यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पंजाबमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं आहे. शहरात पोलीस बंदोबस्तातही वाढ करण्यात आलीय. पंजाब हरयाणातल्या अनेक शाळाही उद्या बंद राहणार आहे. दरम्यान त्यांच्या समर्थकांनी कायद्याचे उल्लंघन केलेच तर चंदीगढ स्टेडियमचा वापर तात्पुरता जेल म्हणून करण्यात येणार आहे.
गणरायाच्या आगमनासाठी भक्तगण सज्ज
भाविक गेल्या कित्येक दिवसांपासून गणरायाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत आहे. शुक्रवार २५ ऑगस्ट रोजी गणेश मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेसाठी पहाटे ४.३०
म्हणजे ब्राह्ममुहूर्तापासून वाजल्यापासून दुपारी १ वाजून ४५ मिनिटांपर्यंत मुहूर्त आहे. घरी गणेशमूर्ती आणण्यासाठी कोणताही मुहूर्त पहाण्याची जरूरी नाही. मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. यंदा गौरी विसर्जन बरोबर जाणारे गणपती ७ दिवसांसाठी विराजमान असणार आहेत व अनंत चतुर्दशीच्या दिवशी जाणारे गणपती १२ दिवसांसाठी विराजमान असणार आहेत.
